मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Konkona Sen Sharma: दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या कोंकणा सेन शर्माबद्दल ‘या’ गोष्टी ऐकल्यात का?

Konkona Sen Sharma: दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या कोंकणा सेन शर्माबद्दल ‘या’ गोष्टी ऐकल्यात का?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 03, 2022 07:33 AM IST

Happy Birthday Konkona Sen Sharma: ‘पेज थ्री’, ‘मिस्टर अँड मिसेस अय्यर’ या सारख्या दमदार चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या कोंकणाने फार कमी वयात एक नव्हे तर दोन राष्ट्रीय पुरस्कारांवर नाव कोरले आहे.

Konkona Sen Sharma
Konkona Sen Sharma

Happy Birthday Konkona Sen Sharma: केवळ आपल्या अभिनयाच्या बळावर बॉलिवूडमध्ये हक्काची जागा निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये कोंकणा सेन शर्मा हिचं नाव घेतलं जात. ‘पेज थ्री’, ‘मिस्टर अँड मिसेस अय्यर’ या सारख्या दमदार चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या कोंकणाने फार कमी वयात एक नव्हे तर दोन राष्ट्रीय पुरस्कारांवर नाव कोरले आहे. पण, कोंकणा सेन शर्मा तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिली आहे. आज (३ डिसेंबर) अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा आपला वाढदिवस साजरा करत आहे.

कोंकणा सेन शर्माचा जन्म ३ डिसेंबर १९७९ रोजी कोलकातामधील एका बंगाली कुटुंबात झाला. कोंकणाचे वडील पत्रकार होते. तर, आई अपर्णा सेन या बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका होत्या. अभिनयाचं बाळकडू कोंकणाला घरातूनच मिळालं होतं. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी कोंकणाने मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. १९८३मध्ये तिने ‘इंदिरा’ नावाच्या बंगाली चित्रपटात बालकलाकार म्हणून पदार्पण केले होते. यानंतर २०००मध्ये बंगाली चित्रपट ‘एक जे अच्छ्या कन्या’ या चित्रपटात खलनायिका साकारून ती विशेष चर्चेत आली.

कोंकणा सेन शर्माने २००२मध्ये अभिनेता राहुल बोस याच्यासोबत ‘मिस्टर अँड मिसेस अय्यर’ हा चित्रपट केला. या चित्रपटाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा कोंकणाची आई अपर्णा सेन यांनी सांभाळली होती. या चित्रपटातील बहारदार अभिनयासाठी कोंकणाचं कौतुक झालंच, पण त्यासोबतच तिला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. यानंतर तिला ‘ओमकारा’ या चित्रपटातील अभिनयासाठी देखील फिल्म फेअर आणि राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले.

कोंकणा सेन शर्मा अभिनेता रणवीर शौरी याच्यासोबतच्या नात्यामुळे देखील चर्चेत आली होती. एका शोच्या निमित्ताने या दोघांची भेट झाली होती. त्यांच्यात हळूहळू मैत्री झाली आणि नंतर प्रेम फुलू लागलं. २०१०मध्ये या जोडीने लग्नगाठ बांधली. मात्र, लग्नाच्या अवघ्या ५ महिन्यांतच कोंकणाने मुलाला जन्म दिला होता. यामुळे कोंकणा लग्नाआधीच गर्भवती असल्याच्या चर्चा झाल्या होत्या. मात्र, त्यांचं लग्नाचं नात फार काळ टिकू शकलं नाही. २०१५मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.

IPL_Entry_Point

विभाग