मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Dada Kondke: ४५ वर्षांनंतरही गाजतंय दादा कोंडके यांच्या चित्रपटातील लावणी अन् भजन! तुम्ही पाहिलात का 'हा' चित्रपट?

Dada Kondke: ४५ वर्षांनंतरही गाजतंय दादा कोंडके यांच्या चित्रपटातील लावणी अन् भजन! तुम्ही पाहिलात का 'हा' चित्रपट?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Oct 27, 2023 11:04 AM IST

Dada Kondke Marathi Movie: दादा कोंडके यांचा एक असाही चित्रपट आहे, ज्यातील लावणी आणि भजन आजघडीला म्हणजेच ४५ वर्षांनंतरही तुफान लोकप्रिय आहेत.

Dada Kondke
Dada Kondke

Dada Kondke Marathi Movie: अभिनेते दादा कोंडके म्हणजे अभिनय आणि विनोदाचा खळखळता झरा. त्यांच्या चित्रपटांनी मनोरंजन विश्व तुफान गाजवलं. भारतीय चित्रपटांच्या इतिहासात दादा कोंडके यांनी एक काळ आपल्या दमदार अभिनयाने गाजवला. त्यांचे चित्रपट इतके धमाल असायचे की, प्रेक्षक पुन्हा पुन्हा थिएटरकडे वळायचे. दादांचा चित्रपट रिलीज झाला की, बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्यांनाही धडकी भरायची. केवळ विनोदच नव्हे, तर त्यांच्या चित्रपटातील अनेक गोष्टी आजही तितक्याच लोकप्रिय आहेत. दादा कोंडके यांचा एक असाही चित्रपट आहे, ज्यातील लावणी आणि भजन आजघडीला म्हणजेच ४५ वर्षांनंतरही तुफान लोकप्रिय आहेत. हा चित्रपट आहे 'तुमचं आमचं जमलं'. हा चित्रपट पुन्हा एकदा घरबसल्या प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

सध्या दादा कोंडके यांचे गाजलेले सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या पाहण्याची संधी मिळत आहेत. दर रविवारी 'झी टॉकीज' या वाहिनीवर दादा कोंडके यांचे सुपर डुपर हिट चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. येत्या रविवारी म्हणजेच २९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता 'तुमचं आमचं जमलं' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा दादा कोंडके यांच्या चाहत्यांना 'तुमचं आमचं जमलं' या चित्रपटाचा आस्वाद घर बसल्या घेता येणार आहे.

Pavitraa Puniya: शूटिंगच्या सेटवरच प्रसिद्ध अभिनेत्रीच्या ब्लाऊजने दिला धोका! व्हिडीओ बघाच...

दादा कोंडके यांच्या चित्रपटातील विनोद, गाणी, संवाद सगळंच हटके असायचं . 'तुमचं आमचं जमलं' या चित्रपटातील 'अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान' हे भजन आज ४५ वर्षानंतरही लोकांच्या मुखात आहे. हे या चित्रपटाचं यश आहे. 'झाल्या तिन्ही सांजा, करून शिणगार सांजा, वाट पाहते मी गं येणार साजन माझा' ही लावणी 'तुमचं आमचं जमलं' या चित्रपटात नायिका अंजना मुमताज आणि नायक दादा कोंडके यांच्यावर चित्रित झाली. अतिशय सात्विक आणि सोज्वळ शब्दरचना असलेली ही लावणी आजही तितक्याच उत्साहाने ऐकली जाते. दादांनी ‘तुमचं आमचं जमलं’ या चित्रपटात अतिशय सुंदर भजन आणि दर्जेदार लावणीची रचना करून हा चित्रपट हिट करून दाखवला.

'तुमचं आमचं जमलं' या चित्रपटाचं दिग्दर्शन स्वतः दादा कोंडके यांनीच केले आहे. एक चांगला आणि एक वाईट भाऊ आणि त्यांची कथा या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळते. वाघ्या कुत्र्याच्या साथीने चित्रपटाचा नायक कृष्णा कशा पद्धतीने समाजातील चुकीच्या गोष्टी प्रकाशात आणतो, याची ही कथा आहे . या चित्रपटात अशोक सराफ यांचीही विशेष भूमिका आहे. एकीकडे ऐतिहासिक चित्रपट आणि तमाशा प्रधान चित्रपट लोकप्रिय होत असताना, दादा कोंडके यांनी आपल्या हटके विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवले. दादा कोंडके यांचा तोच काळ आता प्रेक्षकांना पुन्हा अनुभवता येणार आहे.

IPL_Entry_Point