
Chandravilas new Marathi Serial: ‘चिंची चेटकीण’ बनून लहानग्या प्रेक्षकांचं धमाल मनोरंजन करणारे अभिनेते वैभव मांगले नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असतात. ‘चिंची’ साकारल्यानंतर आता वैभव मांगले प्रेक्षकांना घाबरवायला सज्ज झाले आहेत. त्यांच्या नव्या मालिकेचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘चंद्रविलास’ असे या मालिकेचे नाव असून, यात वैभव मांगले एका हटके भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. वैभव मांगले यांच्यासोबत सागर देशमुख मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
‘चंद्रविलास’ ही गोष्ट आहे दोनशे वर्षांपूर्वीच्या वास्तूची आणि त्यात अडकलेल्या बाप-लेकीची. अनंत महाजन आणि त्याची मुलगी शर्वरी गावातल्या एका जुन्या वाड्यात जातात आणि तिथे अडकून पडतात. ते दोघं तिथे पोहोचल्यापासून अनाकलनीय घटनांची एक मालिकाच सुरू होते. या घटनांमागे असतं, ते या वास्तूत गेल्या दोनशे वर्षांपासून वास्तव्याला असलेला एक आत्मा. त्या आत्म्याला नेमकं काय हवंय, त्यानं कोणत्या उद्देशानं या दोघा वडील-मुलीला त्या वाड्यात अडकवून ठेवलंय, त्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तो आत्मा कोणकोणत्या गोष्टी घडवून आणणार आहे, या सगळ्या दरम्यान त्यांना आणखी कोण-कोण भेटणार आहे आणि त्या आत्म्याच्या तावडीतून सुटण्यासाठी त्या दोघांना कोणत्या दिव्यातून जावं लागणार आहे, या सगळ्याचा उलगडा या मालिकेतून होणार आहे.
‘चंद्रविलास’मधला वास्तव्याचा काळ हा अनंत आणि शर्वरी या बाप-लेकीमधल्या प्रेमाची परीक्षा पाहणारा कसोटीचा काळ असणार आहे. दुष्टशक्तींच्या अचाट सामर्थ्यापुढे वडील-मुलीतल्या प्रेमाचा निभाव लागेल का? अनंत आपल्या लाडक्या मुलीला संकटातून वाचवू शकेल का? हे या उत्कंठावर्धक मालिकेत पाहायला मिळणार आहे.
प्रत्येक भागागणिक एक नवा खुलासा आणि दर खुलाशामागे एक नवी कहाणी असलेली ही मालिका प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात नक्कीच यशस्वी होईल. या मालिकेत प्रमुख भूमिकेत वैभव मांगले असणार आहे. वैभव मांगलेचा हा नवीन लूक आणि हटके भूमिका प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणार आहे. ‘चंद्रविलास’ या मालिकेचं लेखन समीर गरुड आणि प्रसाद जोशी यांनी केलंय. ही मालिका येत्या २७ मार्चपासून झी मराठी वाहिनीवर रात्री ११ वाजता पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या
