मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Avatar: ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ चित्रपट ‘या’ कारणांमुळे ठरणार खास; नव्या ट्रेलरचा धुमाकूळ

Avatar: ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ चित्रपट ‘या’ कारणांमुळे ठरणार खास; नव्या ट्रेलरचा धुमाकूळ

Harshada Bhirvandekar HT Marathi
Nov 23, 2022 11:51 AM IST

Avatar The Way Of Water : ‘अवतार’च्या या सिक्वेल चित्रपटात पेंडोरा आपल्या जमीनीचं आणि आपल्या ग्रहाचं संरक्षण करण्यासाठी लढताना दिसणार आहेत.

Avatar The Way Of Water
Avatar The Way Of Water

Avatar The Way Of Water : जगभरात सध्या चर्चेत असलेल्या ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित दुसरा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रेलरने देखील सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. तब्बल १० वर्षांच्या अंतराने ‘अवतार’ या चित्रपटाचा हा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जगभरातील प्रेक्षक या चित्रपटासाठी प्रचंड आतुर झाले आहेत. अनेक अर्थांनी हा चित्रपट खास ठरणार आहे.

‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ हा चित्रपट केवळ इंग्रजी नाही तर, हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्येही रिलीज होणार आहे. ‘अवतार’च्या या सिक्वेल चित्रपटात पेंडोरा आपल्या जमीनीचं आणि आपल्या ग्रहाचं संरक्षण करण्यासाठी लढताना दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. हा ट्रेलर आता जगभरात धुमाकूळ घालत आहे.

‘अवतार’ या चित्रपटाचा पहिला भाग २००९मध्ये रिलीज झाला होता. आता जर या चित्रपटाचा सिक्वेल पाहण्याची योजना तुम्ही करत असाल, आणि पहिला भाग पाहिला नसेल, तर आधी तो बघणं गरजेचं आहे. कारण या चित्रपटाची कथा पहिल्या भागाच्या कथेवर आधारित आहे. जिथे ‘अवतार’ या चित्रपटाची कथा संपली, तिथूनच पुढे ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ची कथा सुरु होणार आहे. जगभरातील सर्वात महागड्या चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचा समावेश आहे.

‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट येत्या १६ डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाने कलेक्शनचे रेकॉर्ड मोडले होते. या चित्रपटाने तब्बल २० हजार कोटींची कमाई केली होती. आता हा सिक्वेल देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटासाठी तिकीट बुकिंग देखील सुरू झाली आहे. जबरदस्त व्हीएफएक्स आणि अॅक्शनमुळे हा चित्रपट पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस गाजवणार आहे.

IPL_Entry_Point