मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Avatar The Way of Water: भन्नाट दिसतेय पेंडोराची दुनिया; ‘अवतार’चा नवा ट्रेलर पाहिलात का?

Avatar The Way of Water: भन्नाट दिसतेय पेंडोराची दुनिया; ‘अवतार’चा नवा ट्रेलर पाहिलात का?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Nov 03, 2022 02:22 PM IST

Avatar The Way of Water Trailer: 'अवतार' रिलीज होऊन १३ वर्षांनी त्याचा दुसरा भाग म्हणजेच 'अवतार: द वे ऑफ वॉटर' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Avatar The Way of Water Trailer
Avatar The Way of Water Trailer

Avatar The Way of Water Trailer: 'अवतार : द वे ऑफ वॉटर' या चित्रपटाचा नवीन ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक एक झलक पाहण्यासाठी आतुर झाले होते. या चित्रपटाची कथा २००९मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अवतार'चा पुढचा भाग असणार आहे. ‘अवतार’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले होते. आता तब्बल १३ वर्षांनंतर या चित्रपटाचा दुसरा भाग पुन्हा एकदा प्रेक्षकांना पेंडोराच्या दुनियेत घेऊन जाण्यासाठी सज्ज झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'अवतार' रिलीज होऊन १३ वर्षांनी त्याचा दुसरा भाग म्हणजेच 'अवतार: द वे ऑफ वॉटर' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्या भागाची कथा जिथे थांबवली गेली तिथूनच दुसऱ्या भागाची कथा सुरु होणार आहे. 'सुली कुटुंब' (जेक, नेतिरी आणि त्यांची मुले) त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या संकटांपासून स्वतःला कसे सुरक्षित ठेवतात, आपल्या कुटुंबाला आणि स्वतःला वाचवण्यासाठी ते काय काय करतात, हे यात भागात दाखवले जाणार आहे.

'अवतार : द वे ऑफ वॉटर'चा नवा ट्रेलर २ नोव्हेंबरला यूट्यूबवर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाचा हा धमाकेदार ट्रेलर पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. चित्रपटात व्हीएफएक्सचा जबरदस्त वापर करण्यात आल्याचे ट्रेलरवरूनच कळते. जेम्स कॅमेरुन दिग्दर्शित या चित्रपटात सॅम वर्थिंग्टन, जो सलडाना, सिगॉर्नी वीव्हर, स्टीफन लँग आणि केट विन्सलेट यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची पटकथा जेम्स कॅमेरुन, रिक जाफा आणि अमांडा सिल्व्हर यांनी लिहिली आहे. 'अवतार : द वे ऑफ वॉटर' हा चित्रपट येत्या १६ डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

ट्रेलर रिलीज झाल्यानंतर आता त्यावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया देखील येऊ लागल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, 'मी गेल्या १३ वर्षांपासून या चित्रपटाची वाट पाहत आहे. पहिल्याच दिवशी मी हा चित्रपट बघणार आहे.’ आणखी एका यूजरने लिहिले की, 'या चित्रपटाची आता आणखी प्रतीक्षा करू शकत नाही.' तर, एका युजरने लिहिले, 'अखेर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर...' याशिवाय बरेच चाहते हा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करून त्याचे कौतुक करत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग