आपल्या अभिनयाने आणि बिनधास्त स्वभावाने कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर नवीन काय घेऊन येणार? याची उत्सुकता कायमच तिच्या चाहत्यांना असते. वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अपूर्वा आता एका नव्या भूमिकेसह प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे. झी मराठी वाहिनीवरील 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतून ती घराघरात पोहोचलेली. शेवंताच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली अपूर्वा आता एका अनोख्या अंदाजात दिसणार आहे.
आरस्पानी सौंदर्य आणि धारदार नजर यांचा सुरेख मिलाप असणारी करारी बाण्याची ‘शाहीन आपा’ ही भूमिका अपूर्वा लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘रावरंभा’ चित्रपटात साकारणार आहे येत्या १२ मे ला इतिहासातील हे ‘मोरपंखी पान’ पडद्यावर रसिकांसमोर उलगडणार आहे. निर्माते शशिकांत शीला भाऊसाहेब पवार आणि दिग्दर्शक अनुप जगदाळे ‘रावरंभा’ ही प्रेमकहाणी प्रेक्षकांसमोर आणणार आहेत.
‘शिवछत्रपतींच्या कार्याला छुपी मदत करणारी ‘शाहीन आपा’ अतिशय महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा आहे. आपल्या भूमिकेविषयी बोलताना अपूर्वा सांगते, ‘ऐतिहासिक चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका करण्याचा योग जुळून आला असून या भूमिकेसाठी मी तितकीच उत्सुक होते. माझी ही भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. मला स्वत:ला ही काही वेगळं केल्याचं समाधान या भूमिकेने दिलं आहे.
शशिकांत पवार प्रोडक्शन अंतर्गत येणाऱ्या ‘रावरंभा’ चित्रपटाची पटकथा आणि संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. छायांकन संजय जाधव तर संकलन फैजल महाडिक यांचे आहे. सहनिर्माते अजित भोसले आणि संजय जगदाळे आहेत तर कार्यकारी निर्माते महेश भारांबे, अन्वय नायकोडी आहेत. १२ मे ला 'रावरंभा' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.