Amitabh Bachchan Bike Ride: सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा बाईकवरून शूटिंगला पोहोचल्याचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, हीच बाईक राईड आता त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे. काही नेटकऱ्यांनी या कलाकारांविरोधात वाहतूक नियम मोडल्याच्या तक्रारी देखील केल्या आहेत. आता याप्रकरणी मुंबई पोलीस अमिताभ बच्चन आणि अनुष्का शर्मा यांच्यावर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. हेल्मेटशिवाय बाईकवर प्रवास केल्या प्रकरणी अमिताभ बच्चन आणि अनुष्का यांच्यावर मुंबई पोलीस कारवाई करणार आहेत.
सोमवारी शूटला पोहोचण्यासाठी अमिताभ यांनी एका फॅनकडून लिफ्ट घेतली. तर, अनुष्का शर्मा तिच्या बॉडीगार्डसोबत रस्त्यावर बाईक चालवताना दिसली. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये आणि व्हिडीओंमध्ये दोघांनी हेल्मेट घातलेले नाही. यामुळेच आता दोन्ही कलाकारांवर टीकेची झोड उठली आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर करत अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, 'या राईडसाठी धन्यवाद..मी तुम्हाला ओळखत नाही..पण तुम्ही मला वेळेवर कामाच्या ठिकाणी पोहोचवलं. मला ट्राफिक जामपासून वाचवल्याबद्दल धन्यवाद. टोपी, शॉर्ट्स आणि यलो टी – शर्ट.’
बिग बींच्या या पोस्टवर मुंबई पोलिसांना टॅग करत एका चाहत्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई पोलिसांना टॅग करताना या युजरने लिहिले की, 'बाईकस्वार आणि मागील दुचाकीस्वार दोघांचेही हेल्मेट गायब आहे. @MumbaiPolice कृपया लक्ष द्या'. आता या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आपली प्रतिक्रिया दिली असून 'आम्ही हे वाहतूक पोलिसांशी शेअर केले आहे', असे लिहिले आहे.
यासोबतच अनुष्का शर्माचा एक व्हिडीओही मुंबई पोलिसांना टॅग करण्यात आला असून त्यावर @Mumbai Police नो हेल्मेट’ असे लिहिले आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये मुंबई पोलिसांनी ट्विटरवर उत्तर दिले आहे. आता पोलिसांना या दोन्ही प्रकरणांची माहिती देण्यात आली आहे. वाहतूक पोलीस लवकरच कारवाई करण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या