आयपीएल २०२४ चा ३९ वा सामना मंगळवारी (२३ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात लखनौने चेन्नईवर ६ विकेट राखून शानदार विजय नोंदवला. या मोसमात लखनौचा चेन्नईविरुद्धचा हा सलग दुसरा विजय ठरला.
या पराभवानंतर चेन्नईचा संघ गुणतालिकेत टॉप-४ मधून बाहेर पडला. तर लखौने टॉप ४ मध्ये एन्ट्री केली आहे.
दरम्यान, या सामन्यात क्षणभर असे वाटत होते की हा सामना CSK कडे जाईल, पण मार्कस स्टॉइनिसच्या नाबाद शतकाच्या जोरावर लखनौने शेवटच्या षटकात सामना आपल्या नावावर केला.
सीएसकेच्या २११ धावांचा पाठलाग करताना लखनौ संघाने ३ चेंडू बाकी असताना सामना जिंकला. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर हा सामना खेळला गेला. चेपॉकवर चेन्नई सुपर किंग्सचा सामना असतो, तेव्हा चाहत्यांमध्ये कसे वातावरण असते, हे वेगळे सांगायला नको. असेच वातावरण या सामन्यातही होते. संपूर्ण चेपॉक स्टेडियम पिवळ्या रंगात रंगले होते. धोनीचे हजारो चाहते पिवळ्या रंगाची जर्सी घालून मैदानात हजर होते.
पण या पिवळ्या रंगात रंगलेल्या स्टेडियममध्ये लखनौ सुपर जायंट्सच्या एका चाहत्याने खरी मजा आणली. हा चाहता लखनौची निळ्या रंगाची जर्सी घालून मैदानात आला होता. त्याच्या आजूबाजूला सर्व पिवळ्या रंगाची जर्सी घातलेले चाहते दिसत आहेत, तर हा चाहता एकटाच निळ्या रंगाची जर्सी घालून जल्लोष करत होता.
दरम्यान, चेपॉकवरचा हा व्हिडिओ लखनौची टीम विजयाच्या जवळ आली होती, तेव्हाचा आहे. लखनौ सुपर जायंट्सचा जबरा फॅन यलो आर्मीच्या मध्यभागी एकटा बसून LSG ला चीयर करत होता.
वास्तविक, CSK ला त्यांच्या घरच्या मैदानावर लखनौकडून ६ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. चेपॉकवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात संपूर्ण स्टेडियम पिवळ्या समुद्रासारखे दिसत होते. लखनौ सुपर जायंट्सला सपोर्ट करण्यासाठी निळ्या रंगाची जर्सी घातलेले काहीच लोक मैदानात दिसत होते.
लखनौने सामना जिंकताच तो चाहता आनंदाने उड्या मारताना दिसला आणि CSK चे सर्व चाहते त्याला पाहून निराश झाले. कॅमेरामनने लखनौच्या या चाहत्याला कॅमेऱ्यात कैद केले. हा चाहता आता खूपच चर्चेत आला आहे. त्याचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
दरम्यान, दुसरीकडे, सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आयपीएलच्या इतिहासात शतक करणारा पहिला CSK कर्णधार ठरला. त्याने ६० चेंडूत नाबाद १०८ धावा केल्या, तर दुबेने लखनौच्या गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध २२ चेंडूत अर्धशतक करून ६६ धावांवर नाबाद राहिला. गायकवाड-दुबेने १०४ धावांची भागीदारी करून संघाची धावसंख्या २१० पर्यंत नेली.
पण प्रत्युत्तरात लखनौने शेवटच्या षटकात विजयी लक्ष्य गाठले. त्यांच्याकडून मार्कस स्टोइनीसने ६३ चेंडूत नाबाद १२४ धावा केल्या.