मराठी बातम्या  /  बिझनेस  /  kotak mahindra bank : मोठी बातमी! कोटक महिंद्रा बँकेवर आरबीआयचे निर्बंध; खातेदारांवर काय होणार परिणाम?

kotak mahindra bank : मोठी बातमी! कोटक महिंद्रा बँकेवर आरबीआयचे निर्बंध; खातेदारांवर काय होणार परिणाम?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 25, 2024 08:12 AM IST

RBI Restrictions on Kotak Mahindra Bank : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं कोटक महिंद्रा बँकेवर कारवाईचा बडगा उगारत अनेक निर्बंध लादले आहेत.

कोटक महिंद्रा बँकेवर आरबीआयचे निर्बंध; खातेदारांना कसा बसणार फटका?
कोटक महिंद्रा बँकेवर आरबीआयचे निर्बंध; खातेदारांना कसा बसणार फटका? (REUTERS)

RBI Restrictions on Kotak Mahindra Bank : उल्हासनगर येथील कोणार्क अर्बन सहकारी बँकेनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आणखी एका बँकेवर कारवाई केली आहे. खासगी क्षेत्रातील आघाडीच्या कोटक महिंद्रा बँकेवर आरबीआयनं निर्बंध लादले आहेत. त्यानुसार आता कोटक बँकेच्या ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंगवर बंदी असेल. ही बंदी तात्काळ लागू होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

२०२२ आणि २०२३ या वर्षांतील बँकेच्या माहिती तंत्रज्ञान जोखीम परीक्षणात गंभीर त्रुटी आढळल्याच्या पार्श्वभूमीवर आरबीआयनं बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या कलम ३५ अ अंतर्गत ही कारवाई केली आहे. आरबीआयला आयटी इन्व्हेंटरी, पॅच मॅनेजमेंट, युजर अ‍ॅक्सेस, व्हेंडर रिस्क मॅनेजमेंट, डेटा सिक्युरिटी आणि डिझास्टर रिकव्हरीमध्ये महत्त्वपूर्ण त्रुटी आढळून आल्या आहेत. या त्रुटी दूर करण्यात बँकेला अपयश आलं आहे हेही निर्बंधांमागील एक कारण आहे.

आरबीआय म्हणते...

सलग दोन वर्षे आयटी जोखीम आणि सुरक्षा व्यवस्थापनाच्या संदर्भात बँकेत त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यात सुधारणा करण्यास वेळ देऊनही त्रुटी दूर करण्यात बँकेला अपयश आलं. याशिवाय, गेल्या दोन वर्षांत कोअर बँकिंग सिस्टीम आणि डिजिटल चॅनेल्समध्ये वारंवार गंभीर घोळ दिसून आला आहे. रिझर्व्ह बँकेशी उच्चस्तरीय संबंध असूनही बँकेला दैनंदिन कामकाजात सुधारणा करण्यात अपयश आलं आहे. क्रेडिट कार्डशी संबंधित व्यवहारांसह डिजिटल व्यवहारांमध्ये वेगानं वाढ झाल्यामुळं आयटी यंत्रणेवरील बोजा वाढला आहे, असं आरबीआयनं म्हटलं आहे. ग्राहकांच्या हितासाठी आणि भविष्यातील दीर्घकालीन सेवेत अडथळे येऊ नयेत म्हणून हे निर्बंध घातले आहेत, असंही आरबीआयनं स्पष्ट केलं आहे.

तुम्ही कोटक बँकेचे ग्राहक आहात? मग इकडं लक्ष द्या!

आरबीआयनं कोटक महिंद्रा बँकेला आपल्या ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंग (Mobile Banking) चॅनेलद्वारे नवीन ग्राहक जोडण्यास व नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यास मनाई केली आहे. विद्यमान ग्राहकांवर याचा फारसा परिणाम होणार नाही. क्रेडिट कार्डधारकांसह विद्यमान ग्राहकांसाठी बँकेच्या सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहेत. सर्वसमावेशक लेखापरीक्षण आणि इन्कम टॅक्समध्ये आढळलेल्या त्रुटी दूर केल्यानंतर आरबीआयकडून बँकेवरील व्यावसायिक निर्बंधांचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

WhatsApp channel

विभाग