Google India Layoff : जगभरातील आघाडीच्या टेक कंपन्यांनी सुरू केलेली कर्मचारी कपात अद्यापही थांबलेली नाही. गुगल इंडियानं विविध विभागांतील ४५३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढून टाकलं आहे. पोस्टातून पत्र पाठवून कर्मचाऱ्यांना ही माहिती देण्यात आली आहे. गुरुवारी (१६ फेब्रुवारी) रात्री उशिरा कर्मचाऱ्यांना हे कळल्याचंं सांगितलं जात आहे.
गुगल इंडियाचे भारतातील प्रमुख आणि उपाध्यक्ष संजय गुप्ता यांनी मेलद्वारे कर्मचारी कपात केल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे, असं वृत्त बिझनेसलाइननं दिलं आहे. गेल्याच महिन्यात गुगलची मूळ कंपनी असलेल्या अल्फाबेटनं जगभरात मिळून ६ टक्के कर्मचारी काढून टाकण्याचं सुतोवाच केलं होतं. त्यानुसार, एकूण १२ हजार कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. भारतातील ४५३ कर्मचाऱ्यांची कपात ही त्याच योजनेचा भाग आहे की हा स्वतंत्रपणे घेण्यात आलेला निर्णय आहे, याबाबत अद्याप ठोस काहीही समजू शकलेलं नाही.
सध्याच्या कर्मचाऱ्यांना काढून याच क्षेत्रातील नव्या व उमेदीच्या तरुणांना संधी देण्याचा गुगलचा विचार असल्याचं समजतं. जागतिक स्तरावर किती कर्मचार्यांना याचा फटका बसला आहे किंवा बसणार आहे हेही अद्याप समोर आलेलं नाही. संजय गुप्ता यांनी पाठलेल्या ई-मेलमध्ये अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांचीही बाजू मांडण्यात आल्याचं समजतं. ज्या कारणांमुळं कर्मचारी कपात करावी लागत आहे, त्याची संपूर्ण जबाबदारी घेत असल्याचं पिचाई यांनी म्हटलं आहे.
आर्थिक मंदीचं कारण देऊन जगभरातील टेक कंपन्या सध्या लोकांना नोकरीतून काढत आहेत. गुगल इंडिया ही कर्मचारी कपात करणारी एकमेव कंपनी नाही. अॅमेझॉननं तब्बल १८ हजार लोकांना टप्प्याटप्प्यानं नारळ देण्याची योजना आखली आहे, तर फेसबुकनं अर्थात, मेटानं आतापर्यंत १३ हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे.
संबंधित बातम्या