Adani Power : डील फिस्कटली ! अदानी समूहाचा डीबी पावर अधिग्रहण करार स्थगित
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Adani Power : डील फिस्कटली ! अदानी समूहाचा डीबी पावर अधिग्रहण करार स्थगित

Adani Power : डील फिस्कटली ! अदानी समूहाचा डीबी पावर अधिग्रहण करार स्थगित

Updated Feb 16, 2023 05:34 PM IST

Adani Power : २०२२ मध्ये डीबी पावरच्या खरेदीसाठी अदानी समूहाने करार केला होता. अंदाजे ७ हजार कोटींचा करार अदानी पावरने स्थगित केला आहे.

adani power plant HT
adani power plant HT

Adani Power : हिंडेनबर्ग रिसर्चच्या आरोपानंतर अदानी समूहाच्या विस्तार योजनेला आणखी एक धक्का बसला आहे. समूहाची वीज कंपनी अदानी पावरने डीबी पॉवर घेण्याचा निर्णय स्थगित ठेवला आहे. अदानी समूहाने १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत डीबी पॉवरच्या संपादनासाठी ७०१७ कोटी रुपयांचा व्यवहार पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र आता या कराराची समयसीमा संपली आहे.

अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्गच्या अहवालात अदानी समूहावर झालेल्या अनियमिततेच्या आरोपानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. समूहाच्या शेअर्समध्ये झालेल्या या घसरणीमुळे कंपनीला आपल्या विस्तार योजनांचा आढावा घ्यावा लागत आहे. कारण हिंडेनबर्गच्या आरोपानंतर कंपनीसाठी विस्तार योजना पूर्ण करण्यासाठी आवश्यक भांडवल उभारणे हे मोठे आव्हान बनले आहे. यामुळे अदानी पॉवरने आता डीबी पॉवर ताब्यात घेण्याच्या निर्णयापासून माघार घेतली आहे.

भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) २९ सप्टेंबर २०२२ रोजी अदानी पॉवरकडून डीबी पावरच्या अधिग्रहणाला हिरवा सिग्नल दिला होता. त्यानंतर करार पूर्ण करण्यासाठी चार वेळा मुदत वाढवण्यात आली आणि शेवटची मुदत १५ फेब्रुवारी २०२३ होती. ती मुदत आता संपली आहे. अदानी पावरने एक्स्चेंजला कराराची मुदत संपल्याची माहिती दिली आहे.

हा करार संपल्याने अदानी पावरला मोठा धक्का बसला आहे. कारण ऊर्जा क्षेत्रात विस्ताराची योजना देशभर राबवण्यासाठी कंपनी आग्रही होती. हा करार पूर्ण झाल्यानंतर, अदानी पावर ही खाजगी क्षेत्रातील औष्णिक वीज निर्मिती करणारी सर्वात मोठी खाजगी कंपनी बनली असती. २०२१ मध्ये कंपनीने २६ हजार कोटी रुपयांना एसबी एनर्जी इंडियाचे अधिग्रहण केले आहे.

अदानी पावरकडे १३.६ गिगाव्हॅट वीज निर्माण करण्याची क्षमता असलेल्या पाच राज्यांमध्ये सात औष्णिक ऊर्जा प्रकल्प आहेत. कंपनी ४० मेगावॅट सोलरपासून वीज निर्मितीही करते.३० सप्टेंबर २०२२ पर्यंत कंपनीकडे ३६,०३१ कोटी रुपयांचे कर्ज थकीत होते. हिंडेनबर्गच्या आरोपानंतर अदानी समूहाला अदानी एंटरप्रायझेसचा एफपीओ मागे घ्यावा लागला. त्यानंतर आता डीबी पावरच्या अधिग्रहणालाही हिडेनबर्गच्या आरोपांचा फटका सहन करावा लागत आहे.

Whats_app_banner