मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Macfos IPO : मॅकफॉसच्या आयपीओवर गुंतवणूकदारांनी दाखवला विश्वास, ४६००कोटींची बोलींसह ओव्हरसबस्क्राईब

Macfos IPO : मॅकफॉसच्या आयपीओवर गुंतवणूकदारांनी दाखवला विश्वास, ४६००कोटींची बोलींसह ओव्हरसबस्क्राईब

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Feb 22, 2023 04:42 PM IST

Macfos IPO : इलेक्ट्रॉनिक पार्ट्सची विक्री करणारी ई-कॉमर्स कंपनी मॅकफॉस लि. च्या आयपीओसाठी ४६०० कोटी रुपयांची बोली लागली आहे. या आयपीओसाठी १७ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी या कालावधीत नोंदणी सुरू होती.

IPO HT
IPO HT

Macfos IPO : इलेक्ट्रॉनिक पार्ट्सची विक्री करणारी ई-कॉमर्स कंपनी मॅकफॉस लि. च्या आयपीओसाठी ४६०० कोटी रुपयांची बोली लागली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर या शेअरची नोंदणी होणार आहे. या आयपीओसाठी १७ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी या कालावधीत नोंदणी सुरू होती. कंपनीने या शेअरचा किंमतपट्टा ९५ ते १०२ रुपये निश्चित केला होता.

या आयपीओला पहिल्या दिवसापासूनच उदंड प्रतिसाद मिळाला. शेवटच्या दिवशी तब्बल २७०.५८ पट नोंदणी झाली. बिगरसंस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेल्या भागाची ४८८.८२ पट अधिक नोंदणी झाली. तर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स राखीव शेअरसाठी ५३.७० पट अधिक बोली लागली. तर सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठीच्या राखीव शेअरसाठी २६८.४५ पट नोंदणी झाली. या शेअरसाठी १.७३ लाख गुंतवणूकदारांनी बोली लावली.

हेम सिक्युरिटीज लिमिटेडद्वारे या आयपीओचे व्यवस्थापन करण्यात आले, तर बिगशेअर सर्व्हिसेस प्रा.लि. हे या आयपीओ इश्यूचे रजिस्ट्रार होते. शेअर वाटप २४ फेब्रुवारी रोजी अपेक्षित असून, २८ फेब्रुवारी रोजी शेअर गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात जमा होतील.

कंपनीने एकूण २३ लाख २८ हजार शेअर विक्रीसाठी खुले केले होते. त्यापैकी १, १६, ४०० शेअर्स अँकर गुंतवणूकदारांसाठी, ११,०४,००० पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (क्युआयबी), ३,३२,४०० शेअर्स बिगरसंस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (एनआयआयआय) तर ७,७५,२०० शेअर सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी (आरआयआय) राखीव होते. सर्वसामान्य गुंतवणूकदारांना १२०० इक्विटी शेअर्ससाठी बोली लावणे आवश्यक होते. सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठीच्या राखीव शेअरसाठी कंपनीने निश्चित केलेल्या शेअरच्या किंमतपट्ट्यातील कमाल किंमतीनुसार म्हणजे प्रति शेअर १०२ रुपये याप्रमाणे एकूण शेअर्सचे मूल्य २३.७४ कोटी रुपये आहे.

मॅकफॉस ही एक ई-कॉमर्स कंपनी असून, ती तिच्या वेबसाइट आणि मोबाईल अॅप्लिकेशन Robu.inद्वारे १२,००० हून अधिक इलेक्ट्रॉनिक भागांची विक्री करते. हे उत्पादन संशोधन व विकासासह आणि प्रोटोटाइपिंगला गती देते. कंपनीची उत्पादने आयओटी, रोबोटिक्स, ऑटोमेशन, ड्रोन, इलेक्ट्रिक वाहने, थ्रीडी प्रिंटिंग आणि ऑटो-गायडेड वाहने यासारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानासह मूलभूत आणि प्रगत अभियांत्रिकी उत्पादने आणि प्रकल्पांमध्ये वापरली जातात. कंपनीने आर्थिक वर्ष २०२२ मध्ये २.०५ लाख ऑर्डरद्वारे ८०,००० ग्राहकांना सेवा दिली आहे.

मॅकफॉस लि.च्या शेअर्सची एक मार्च रोजी बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर नोंदणी होण्‍याची अपेक्षा आहे. या इश्यूमध्ये २३ लाख २८ हजार इक्विटी शेअर्सची संपूर्ण ऑफर फॉर सेल (ओएफएस) होती. १० रुपये दर्शनी मूल्याप्रमाणे याचे एकूण मूल्य २३७४ कोटी रुपये होते.

बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर कंपनीच्या शेअरची नोंदणी करण्याचा लाभ घेणे हे कंपनीचे उद्दीष्ट आहे. नोंदणी झाल्यानंतर कंपनीबद्दल भागधारकांमध्ये सकारात्मकता निर्माण होईल. यामुळे कंपनीच्या शेअरसाठी सार्वजनिक बाजारपेठही उपलब्ध होईल, अशी कंपनीला अपेक्षा आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग