मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Adani Wilmar Q4 Results : 'अदानी विल्मर'च्या नफ्यात ६० टक्क्यांची घट; गुंतवणूकदारांची धावाधाव

Adani Wilmar Q4 Results : 'अदानी विल्मर'च्या नफ्यात ६० टक्क्यांची घट; गुंतवणूकदारांची धावाधाव

May 03, 2023 05:13 PM IST

Adani Wilmar Quarterly Results : अदानी समूहातील अदानी विल्मर कंपनीचा नफा तब्बल ६० टक्क्यांनी घटला असून त्याचा फटका शेअरच्या भावाला बसला आहे.

Gautam Adani
Gautam Adani (PTI)

Adani Wilmar Quarterly Results : वर्षभरापूर्वी आयपीओच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये उतरलेल्या अदानी समूहाच्या अदानी विल्मर कंपनीनं मधल्या काळात गुंतवणूकदारांना उत्तम रिटर्न्स मिळवून दिले होते. मात्र, हिंडेनबर्गच्या अहवालानंतर या शेअरला मोठा फटका बसला होता. त्यानंतर सावरू पाहणाऱ्या विल्मरला मार्च २०२३ ला संपलेल्या तिमाही निकालांनी दणका दिला आहे.

अदानी विल्मारच्या निव्वळ नफ्यात तब्बल ६० टक्क्यांची घट झाली आहे. नुकत्याच संपलेल्या चौथ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ९३.६ कोटी आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीचा नफा २३४.३ कोटी रुपये इतका होता. खाद्यतेलाच्या किंमती घसरल्यामुळं कंपनीचा महसूल या तिमाहीत ७ टक्क्यानं घटून १३,८७३ कोटी रुपये झाला आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत कंपनीचा महसूल १४,९१७.३ कोटी रुपये होता.

IPO News : तब्बल १८ वर्षांनंतर येतोय टाटाच्या या कंपनीचा आयपीओ; कमाईची मोठी संधी

अदानी विल्मरनं पुन्हा एकदा अंगशु मल्लिक यांची सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. ते पुढील तीन वर्षे या पदावर राहणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये कंपनीनं ५ दशलक्ष मेट्रिक टन विक्रीचं उद्दिष्ट गाठलं. तांदूळ आणि गव्हाच्या पिठाच्या विक्रीची उलाढाल १ हजार कोटी रुपयांहून अधिक होती. कंपनीच्या फूड सेगमेंटमधील विक्रीचा आकडा केवळ दोन वर्षांत दुप्पट झाला आहे.

शेअरमध्ये घसरण

तिमाही निकालानंतर अदानी विल्मरच्या शेअरची किंमत ५ टक्क्यांहून अधिक घसरली आहे. आज दिवसभरात कंपनीचा शेअर १९.०५ रुपयांनी घसरून ३९६.४० रुपयांवर बंद झाला आहे. स्टॉक मार्केटमधील आजच्या व्यवहारादरम्यान शेअरची किंमत ३९० रुपयांपर्यंत खाली आली होती. त्याचबरोबर कंपनीचं बाजार भांडवल ५१ हजार कोटी रुपयांवर आलं आहे.

अदानी विल्मर फॉर्च्युन ब्रँड अंतर्गत खाद्यतेल विकते. याशिवाय कंपनी तांदूळ आणि साखर यांसारख्या इतर खाद्यपदार्थांचीही विक्री करते.

WhatsApp channel