मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uddhav Thackeray Dasara Melava 2022: होय गद्दार ते गद्दारच.. उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
दसरा मेळावा

Uddhav Thackeray Dasara Melava 2022: होय गद्दार ते गद्दारच.. उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात

Oct 05, 2022, 08:37 PMIST

Shiv Sena Dasara Melava 2022 at Shivaji Park LIVE Updates:यंदा शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला अभूतपूर्व महत्व प्राप्त झाले आहे. शिवसेनेच्या इतिहासात आजचा दिवस १९६६ च्या शिवसेना स्थापनेच्या पहिल्या वर्षीच्या दसरा मेळाव्याप्रमाणे असणार आहे.शिवसेनेचे दोन मेळावे मुंबईत एकाचवेळी होत आहेत.

Oct 05, 2022, 08:38 PMIST

प्रत्येक निवडणुकीत त्यांना पाणी पाजावंच लागेल

अंगावर आता आलेलाच आहात तर आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अंगावर घ्याव लागेल, प्रत्येक निवडणुकीत त्यांना पाणी पाजावंच लागेल. ज्या आदिशक्तीने महिषासूर मारला तीच महिषासूरमर्दिनी हा खोकासूर मारल्याशिवाय राहणार नाही

Oct 05, 2022, 08:38 PMIST

मी पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन -उद्धव

मी तुम्हाला वचन देतो, तुमच्या मनातली जी आग आहे या आगीतून शिवसेनेचा वनवा पेटणार आहे. त्यात हे गद्दार आणि त्यांची गद्दारी रावणासारखी जळून खाक होणार आहे. मी पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन

एका अर्थी झालं ते बरं झालं की बांडगुळं सगळी छाटली गेली. ही बांडगुळं आपण खांद्यावर पोसत होतो, बांडगुळांची मुळं वृक्षाच्या फांदीत असतात आणि वृक्षाची मुळं ही जमिनीत असतात

Oct 05, 2022, 08:38 PMIST

मी लढणाऱ्या पित्याचा लढणारा पूत्र आहे, उद्धव

मी लढणाऱ्या पित्याचा लढणारा पूत्र आहे, शिवसेनेवर आलेली संकट बघत मोठा झालोय. आजही माझ्या हातात काही नाही. माझ्यासोबत चालायचं असेल तर निखाऱ्यावर चालायची तयारी असायला पाहिजे. वाटेत काटे असतील, खडे असतील, टोचतील, पाय रक्तबंबाळ होतील.

Oct 05, 2022, 08:38 PMIST

अशोक चव्हाणांनी तुमचा गोप्यस्फोट केला

हिंदुत्व आम्ही सोडलं म्हणता, का तर काँग्रेससोबत गेलो म्हणून, पाच वर्षे आम्ही तुमच्यासोबत होतो, तेव्हा कसे जाऊन अशोक चव्हाण यांना भेटले याचा गौप्यस्फोट अशोक चव्हाणांनी केला

Oct 05, 2022, 08:38 PMIST

अजित पवारांनी कधीही माईक खेचला नव्हता -उद्धव

माझं आजही आव्हान आहे, एकच व्यासपीठावर भाजपची स्क्रीप्ट न घेता भाषण करून दाखवायचं हे आव्हान आहे. मी मुख्यमंत्री असताना पाच सहा पत्रकार परिषदा झाल्या. तेव्हा माझ्यासोबत अजित पवार होते, त्यांनी कधीही माईक खेचला नव्हता

Oct 05, 2022, 08:38 PMIST

तोतये बाळासाहेबांचा चेहरा लावून शिवसेना पळवायला आलेत

रावणाने जसं संन्यासाचं रुप घेऊन सितेचं हरण केलं तसं हे तोतये बाळासाहेबांचा चेहरा लावून शिवसेना पळवायला आलेत

Oct 05, 2022, 08:38 PMIST

बलात्कारातील आरोपी तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांचे जल्लोषी स्वागत, कुठे चाललो आहोत आपण -उद्धव

खून कशासाठी तर अंकिताने रिसॉर्टमध्ये जे काही चालत होतं त्यासाठी नकार दिला, म्हणून तिचा खून झाला, आज तिची आई टाहो फोडतेय. हासुद्धा त्या महिला शक्तीचाच आक्रोश आहे, काय कारवाई केली? अंकिता भंडारी ही जशी महिला, दुसरी बिल्किस बानो त्या दंगलीत गर्भवती होती, तिच्यावर बलात्कार झाला, तिच्या डोळ्या समोर तीन साडेतीन वर्षांच्या मुलीचा खून झाला. आरोपींना शिक्षा झाली, शिक्षा भोगत होते, त्यांना सोडण्यात आलं आणि गावी गेल्यानंतर त्यांचे स्वागत झाले.

Oct 05, 2022, 08:38 PMIST

हा महिला शक्तीचा आदर? उद्धव यांचा उत्तराखंड भाजपला सवाल

आज मोहन भागवत महिलाशक्तीवर बोलले, मातृभक्तीवर बोलले तुम्ही ज्या महिला शक्तीचा उल्लेख केलात. महिला शक्तीचा आदर ठेवताना उत्तराखंडमध्ये १९ वर्षांच्या मुलीचा खून झाला, एका रिसॉर्टच्या बाजुला तिचा मृतदेह आढळला, ते रिसॉर्ट भाजपच्या स्थानिक नेत्याचं आहे, हा महिला शक्तीचा आदर?

Oct 05, 2022, 08:38 PMIST

मोहन भागवत हे मशिदीत जाऊन आले, त्यांनी हिंदुत्व सोडलं का? उद्धव

मोहन भागवत हे मशिदीत जाऊन आले, त्यांनी हिंदुत्व सोडलं का , कशाला गेले होते, संवाद करायला, मुसलमान म्हणतात राष्ट्रपिता आहेत. आम्ही सांगत होतो राष्ट्रपती करा,

Oct 05, 2022, 08:38 PMIST

देश हुकुमशाहीकडे चाललाय, पुन्हा आपल्या देशात गुलामगिरी येईल -उद्धव

भाजपचे नड्डा बोलले की शिवसेना संपत चाललेला पक्ष आहे, देशात कोणते पक्ष शिल्लक राहणार नाहीत, मी तुम्हाला सांगतो सगळे पक्ष संपणार म्हणजे देश हुकुमशाहीकडे चाललाय, पुन्हा आपल्या देशात गुलामगिरी येईल, ते तुम्हाला चालणार आहे काआपल्या देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची गरज आहे

Oct 05, 2022, 08:38 PMIST

त्यांनी त्यांचं हिंदुत्व सांगावं, मी माजं वडिलोपार्जित हिंदुत्व सांगतो - उद्धव

सर्व तथाकथित हिंदुंनी एका व्यासपीठावर यावं, त्यांनी त्यांचं हिंदुत्व सांगावं, मी माजं वडिलोपार्जित हिंदुत्व सांगतो. प्रत्येकाने आपआपला धर्म घरात ठेवावा, घरातून बाहेर पडल्यानंतर हा देश माझा ही शिकवण बाळासाहेबांनी मला दिलीय

Oct 05, 2022, 08:38 PMIST

..तर आमचे शिवसैनिक अमित शहांना खांद्यावर घेऊन नाचतील

अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत की पक्षाचे. नुसते हे सरकार पाड, ते सरकार पाड.अमित शहाजी तुम्ही हिंमत असेल तर एक फूट जमीन जिंकून दाखवा सात ते आठ वर्षे झाली, मोदींच्या मुलाखती आजही ऐकतो, पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायचं आहे पाकिस्तानची एक इंचही जमीन घेतलेली नाही, घेऊन दाखवा आम्ही डोक्यावर घेऊन नाचतो, जर तुम्ही पाकव्याप्त काश्मीर घेऊन दाखवलं तर आमचे शिवसैनिक खांद्यावर घेऊन नाचतील

Oct 05, 2022, 08:38 PMIST

आपल्या देशाची पत घसरतेय - उद्धव ठाकरे

ज्या देशाचं चलन घसरतं तेव्हा नुसता रुपया नाही तर देशाची पतसुद्धा घसरत असते असं सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या. आपल्या देशाची पत घसरतेय.

Oct 05, 2022, 08:38 PMIST

कोंबडी चोरांवर या मेळाव्यात जास्त नाही बोलायचं ही विचारांची परंपरा आहे -उद्धव

कोंबडी चोरांवर या मेळाव्यात जास्त नाही बोलायचं ही विचारांची परंपरा आहे, उद्धव ठाकरेंचे विचार ऐकायला आलेत. शिव्या देणं सोपं असतं, पण विचार देणं कठीण असतं. मी ती परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय

Oct 05, 2022, 08:38 PMIST

आरएसएसच्या होसबाळे यांनी  संघाला आणि भाजपला आरसा दाखवायचं काम केलं

हिंदुत्व हिंदुत्व म्हणत गाईवर बोलताय पण महागाईवर बोला, महागाईने जग होरपळतंय, या वेदना तुम्हाला जाणवू नयेत म्हणून हिंदुत्वाचा डोस द्यायचा. तुम्ही मंत्र्यांकडे गेलात आणि डाळी महागल्या, हे महागलं सांगितलं की जय श्री राम महागाईवर बोलत नाहीत. आरएसएसच्या होसबाळे यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. तुम्ही संघाला आणि भाजपला आरसा दाखवायचं काम केलं

Oct 05, 2022, 08:38 PMIST

हिंदुत्व म्हणजे धोतर नाही पाहिजे तेव्हा नेसलं आणि पाहिजे तेव्हा सोडलं -उद्धव

भाजपवाल्यांकडून हिंदुत्व शिकण्याची गरज नाही. हिंदुत्व म्हणजे धोतर नाही पाहिजे तेव्हा नेसलं आणि पाहिजे तेव्हा सोडले, आम्ही उद्याही हिंदू असू आणि मरू तेव्हाही हिंदूच असणार.इकडे जिवंत मेळावा आहे, तिकडं रडगाणी आहेत, कसा अन्याय झाला असं. तिकडे ग्लिसरीनच्या बाटल्या गेल्यात खूप

Oct 05, 2022, 08:38 PMIST

पुन्हा येईन म्हणणारे मनावर दगड ठेऊन पुन्हा आलेत , उद्धव यांचा फडणवीसांना टोला

बोलायची पंचाईत होते, कारण आपले माननिय उपमुख्यमंत्री यांना कायदा चांगला कळतो. हा काही टोमणा नाही मारलेला, सभ्य गृहस्थ आहेत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, जाताना बोलून गेले होते की मी पुन्हा येईन, दीड दिवस आले आणि दीड दिवसात विसर्जन झाले. मनावर दगड ठेवून पुन्हा आले. आता म्हणतायत कायद्याच्या चौकटीत राहून बोला, नाहीतर कायदा आपले काम करेल. कायदा तुम्हालाच कळतो असं नाही आम्हालाही कळतो कायदा सर्वांनीच पाळायला हवा.

Oct 05, 2022, 08:38 PMIST

आनंद दिघे आज आठवत आहेत, कारण आज ते नाहीत  आणि काही बोलू शकणार नाहीत -उद्धव

स्वत:चे विचार नाहीत, शिवसेना प्रमुखांचे फोटो लावून मते मागायची. आनंद दिघे आज आठवतायत कारण आज ते नाहीयेत आणि काही बोलू शकणार नाहीत. आनंद दिघेंनी जातानासुद्धा भगवा सोडला नाही

Oct 05, 2022, 08:38 PMIST

त्यांना शिवसेना प्रमुख व्हायचे आहे, मात्र आहे यांची लायकी - उद्धव

अडीच वर्षे तुमची अडीच वर्षे शिवसेनेची हे मी सांगत होतो, मग आता जे केलेत ते तेव्हा का नाही केलं पण शिवसेना संपवायची होती त्यांना इतरांना बाजूला सारून तिकिट दिलं, आमदार केलं, मंत्री केलं आता शिवसेना प्रमुख व्हायचं आहे. शिवसेना प्रमुख व्हायची आहे लायकी

Oct 05, 2022, 08:38 PMIST

तेव्हा बोलताना दाढी तोंडात जात होती का? उद्धव यांचा शिंदेंना टोला

जर मी हिंदुत्व सोडलं का हे तुम्ही मला सांगा, मी जेव्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा पहिल्या सात जणांमध्ये त्यांचाही मान राखला होता. तेव्हा माहिती नव्हतं का काँग्रेस राष्ट्रवादीचे बाजूला बसलेत. की तेव्हा बोलताना दाढी तोंडात जात होती का?

Oct 05, 2022, 08:38 PMIST

पंगा घेतलेला आहात, देव तुमचं भलं करो. ही धमकी नाही तर ही तेजाचा शाप 

पंगा घेतलेला आहात, देव तुमचं भलं करो. ही धमकी नाही तर ही तेजाचा शाप आहे. ज्यांना आपण सगळं काही दिलं. मंत्रिपदं दिली, आमदारकी, खासदारकी दिली. ज्यांना दिलं ते नाराज झाले, ज्यांना काही दिलं नाही ते आजही निष्ठेने सोबत आहेत हे माझं नशिब आहे

Oct 05, 2022, 08:38 PMIST

हा उद्धव नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे

वाईट एका गोष्टीचं वाटतं की जेव्हा मी माझ्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात होतो तेव्हा माझी बोटं हालत नव्हती, शरीर निश्चल होत तेव्हा ज्यांच्यावर जबाबदारी दिली ते कटाप्पा, हो कटप्पा म्हणजे कट करणारे अप्पा म्हणजे कटाप्पा... ते कट करत होते हा पुन्हा आपल्यासमोर येऊ शकणार नाही.. पण त्यांना कल्पना नाही हा उद्धव नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे.

Oct 05, 2022, 08:01 PMIST

आतापर्यंत दहा तोंडाचा होता आता ५० खोक्यांचा धोकासूर झाला आहे - उद्धव

दरवर्षी परंपरेप्रमाणे आपल्या मेळाव्यानंतर रावण दहन होणार आहे. यावेळचा रावण वेगळा आहे. जसा काळ बदलतो तसा रावणही बदलतो. आतापर्यंत दहा तोंडाचा होता आता ५० खोक्यांचा धोकासूर झाला आहे.

Oct 05, 2022, 07:56 PMIST

एकही माणून भाड्याने किंवा पैशाने आणलेला नाही

ही गर्दी विकत मिळत नाही. ही कोरडी गर्दी नाही. अंत:करण ओलं असलेल्या माझ्या जिवाभावाच्या शिवसैनिकांची गर्दी आहे. याच मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मी तुम्हाला नतमस्तक झालो होतो. कोणत्याही अनुभवाशिवाय तुमच्या प्रेमाच्या जोरावर कारभार केला. अजूनही डॉक्टरांनी मला वाकण्याची परवानगी दिलेली नाही. पण तुमच्यासमोर नतमस्तक झाल्याशिवाय मी पुढे जाऊच शकत नाही – उद्धव ठाकरे

Oct 05, 2022, 07:56 PMIST

तुझा मुलगाही तुझ्या पक्षात आला नाही", भास्कर जाधवांचं नारायण राणेंवर टीकास्र

शिवसेना सोडून १८ वर्ष झाली. पण सारखं मी शिवसेना सोडल्यानंतर शिवसेना सोडली म्हणे. अरे मेलास तू, तुला उद्धव ठाकरेंनी दोन वेळा पाडला. तुझ्या मुलाला दोन वेळा पाडला. तू पक्ष काढलास, त्या पक्षात तुझा मुलगाही आला नाही. मला फडणवीसांना एकच विचारायचं आहे. तुम्ही यांच्या तोंडून आज घाण बोलून घेत आहात. पण विधानपरिषदेच्या सभागृहात याच कोंबडीचोरानं म्हटलं होतं की भाजपा म्हणजे लुटारूंचा, दारुवाल्यांचा पक्ष असल्याचं म्हटलं होतं. आज तुमच्याकडे तो आल्यानंतर तो सज्जन झाला – भास्कर जाधव

Oct 05, 2022, 07:56 PMIST

शिपाई ते शिपाईच.. भास्करराव जाधव यांची राणेंवर टीका

हा अकलेचा कांदा, कोंबडीवाल.. याची कुंडली माझ्याकडे, त्याची कुंडली माझ्याकडे. तिकडे प्राप्तीकर विभागात शिपाई होतास. शिवसेनाप्रमुखांनी एवढं मोठ केलं, तरी शिपाई तो शिपाईच राहिला. मला तोंड उघडायला लावू नका म्हणे. खरंच तोंड उघडलं तर एवढं घाणेरडं आहे की याच्या तोंडून कधी चांगलं काही निघतच नाही – भास्कर जाधव

Oct 05, 2022, 07:56 PMIST

पोलिसांमध्ये काही हरामखोरांची अवलाद पैदा होत असते  - अंबादास दानवे

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे भाषण सुरु असतानाच त्यांनी पोलिसांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. पोलीस खरोखरच चांगले आहेत, मात्र या पोलिसांमध्ये काही हरामखोरांची अवलाद पैदा होत असते असे वक्तव्य अंबादास दानवे यांनी केले आहे.

Oct 05, 2022, 07:56 PMIST

उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवरील जनतेसमोर नतमस्तक 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं शिवाजी पार्कवरील व्यासपीठावर  येताच गुडघ्यावर बसून व्यासपीठाला व समोरील जनतेसमोर नतमस्तक झाले. 

Oct 05, 2022, 07:56 PMIST

किरीट सोमय्या भाऊ १० कोटींची चौकशी कधी करणार - अंधारे

संजय राऊतांच्या मुलीच्या लग्नात मेहंदीवाल्याची, ब्युटी पार्लरवाल्याचीही चौकशी केली होती. आता बीकेसीच्या मैदानासाठी १० कोटी रुपये कुणाच्या खात्यातून खर्च केले? किरीट सोमय्या, १० कोटींची चौकशी कधी करणार ते आधी बघा – सुषमा अंधारे

Oct 05, 2022, 07:56 PMIST

तुमच्या जागा भाजपला देणार का, सुषमा अंधारेंचा शिंदे गटाला सवाल

तुम्हाला एक आव्हान आहे. तुम्ही खरंच हिंदुत्ववादी असाल, तर कल्याणमधली श्रीकांत शिंदेंची जागा भाजपाला देऊन टाका. मुंबईतली प्रताप सरनाईकांची जागा भाजपाला देऊन टाका. शिरुरमधली आढळराव पाटलांची जागा भाजपाला देऊन टाका. त्याग काय ते तरी कळेल – सुषमा अंधारे

Oct 05, 2022, 07:56 PMIST

नुपूर शर्मासारखी थिल्लर वक्तव्य केली नाही, ही उद्धव ठाकरें चूक आहे का? -अंधारेंचा शिंदे गटाला सवाल

उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं म्हणजे काय इतर धर्माचा स्वीकार केला का? त्यांनी नुपूर शर्मासारखी थिल्लर वक्तव्य केली नाही, ही त्यांची चूक आहे का?  तसेच कोणत्या हिंदू धर्मग्रंथात, वेदात किंव उपन्यासमध्ये असे लिहिले आहे की, की हिंदुत्वासाठी दुसऱ्या धर्माचा द्वेष करावा – सुषमा अंधारे

Oct 05, 2022, 07:56 PMIST

नारायण राणेंनी सोनियाच्या पायावर लोटांगण घालत १० वर्षे आमदारकी, खासदारकी व मंत्रिपदे भोगली - अंधारे

नारायणराव, तुम्ही शहाणेसुरते आहात. पण तुम्ही बोलावं हिंदुत्वावर? विसरलात का नारायणराव, त्याच सोनिया गांधींच्या पायावर लोटांगण घालत गेली १० वर्ष आमदारकी, खासदारकी, महसूलमंत्रीपद भोगली.. त्या तुम्ही शेंड्यावर शहाणं होऊन आम्हाला हिंदुत्वावर सांगायचं का?

Oct 05, 2022, 07:56 PMIST

किरण पावसकरांनी हिंदुत्व ६ वर्षे कोठे टांगून ठेवले होते - सुषमा अंधारे

किरण पावसकरांनी म्हणावं की आम्ही हिंदुत्वासाठी जातोय? तुम्ही शिवसेनेत होता..अजित पवारांनी चॉकलेट दिल्यावर राष्ट्रवादीत गेलात. मग मिंधे गटात गेलात. किरण पावसकर, तुमचं हिंदुत्व ६ वर्ष कुठे टांगून ठेवलं होतं?

Oct 05, 2022, 07:10 PMIST

मुंबई महापालिकेपेक्षा नागपूरच्या आपली बस योजनेची चौकशी करा, फडणवीसांना देसाईचा टोला

नागपूरहून आलेले फडणवीस मुंबईतील कामकाजाची चौकशी करणार असल्याचे म्हणतात. त्यांनी आधी नागपूर महापालिकेच्या कामकाजाची चौकशी करा.  आपली बस योजनेत खासगी ठेकेदारांना मिळालेल्या तिकीटाच्या पैशातून निधी देण्यात येणार होता. मात्र आता त्यांना १०० कोटी रुपये देण्याचा घाट घातला जात आहे. ५०० कोटी मालमत्ता कराचा घोटाळा नागपुरात घडला आहे. याकडे आधी लक्ष द्या मग मुंबईकडे बघा, असा टोला सुभाष देसाईंनी फडणवीसांना लगावला.  

Oct 05, 2022, 07:10 PMIST

तुमच्या माथ्यावरचा गद्दारीचा शिक्का कधीच पुसला जाणार नाही - किशोरी पेडणेकर

नेहमी वाटतं की तुम्ही गेलात तर ठीक आहे, पण स्वत:चं घर जाळण्याचं पाप करु नका. हा इतिहास तुम्ही कधी बदलू शकणार नाही आणि शिवसैनिक तुम्हाला तसं करू देणार नाही. तुमच्या माथ्यावरचा गद्दारीचा शिक्का आता कधीही पुसला जाणार नाही. 

Oct 05, 2022, 06:58 PMIST

काळ्या पायाचे सरकार आल्यापासून  पावणेचारशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या - दानवे

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर गेल्या ७०-८० दिवसांत मराठवाडा आणि विदर्भात पावणेचारशेच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या – अंबादास दानवेंचा गंभीर दावा

Oct 05, 2022, 06:58 PMIST

खासदार गजानन किर्तीकर शिवाजी पार्कवर दाखल

शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा असलेल्या गजानन किर्तीकर शिवतीर्थावर दाखल झााले आहेत. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीशी झालेली युती चुकीचीच असल्याचे किर्तीकर ठाम असल्याचे म्हटले आहे. 

Oct 05, 2022, 06:21 PMIST

उद्धव ठाकरेंच्या भाषणाआधी खालील १० नेत्यांची होणार भाषणे

भास्कर जाधव, नितीन बानुगडे पाटील, सुषमा अंधारे, अंबादास दानवे, किशोरी पेडणेकर, सुभाष देसाई ,अरविंद सावंत, चंद्रकांत खैरे, विनायक राऊत आणि आदित्य ठाकरे

Oct 05, 2022, 05:19 PMIST

उद्धव ठाकरेंचे भाषण आठ वाजता होणार सुरू

दादरमधील शिवाजी पार्कवरही  शिवसैनिकांची गर्दी जमायला सुरुवात झाली आहे. सायंकाळी सहा वाजल्यापासून शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला सुरुवात होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे साडेसात वाजता आपल्या ‘मातोश्री’ या निवासस्थानावरुन सभास्थळाकडे निघतील. त्यानंतर अंदाजे आठ वाजण्याच्या सुमारास उद्धव यांच्या भाषणाला सुरुवात होणार आहे,

Oct 05, 2022, 03:38 PMIST

ठाकरे-शिंदे गटाच्या मेळाव्याची उत्सुकता शिगेला

उद्धव ठाकरे कोणावर निशाणा साधतात तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांना कोणता संदेश देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवतीर्थावर ठाकरे गटाचा तर बीकेसीवर एकनाथ गटाचा दसरा मेळावा होत आहे. राज्यभरातून कार्यकर्ते जमवण्यासाठी दोन्ही गटांनी जारदोर प्रयत्न केले आहेत. आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून १० हजाराहून अधिक वाहने मुंबईत दाखल झाली आहेत. यामुळे मुंबईतील वाहतूक मार्गातही बदल करण्यात आले आहेत.

    शेअर करा