मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Assembly Session 2nd day Live: विधानसभेचं आजच्या दिवसाचं कामकाज संपलं!
Vidhan Bhavan

Maharashtra Assembly Session 2nd day Live: विधानसभेचं आजच्या दिवसाचं कामकाज संपलं!

Aug 18, 2022, 05:29 PMIST

Maharashtra Assembly Monsoon Session 2nd day: राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. राज्यातील अतिवृष्टी व त्यामुळं झालेल्या नुकसानीचा मुद्दा आज गाजण्याची शक्यता आहे.

Aug 18, 2022, 05:29 PMIST

Maharashtra Vidhan Sabha Session: राज्य विधानसभेचं आजचं कामकाज संपलं!

राज्य विधानसभेचं आजच्या दिवसाचं कामकाज संपलं असून पुढील कामकाज सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता सुरू होईल.

Aug 18, 2022, 03:43 PMIST

Nana Patole: शेतकऱ्यांना डिझेलवर सबसिडी देण्याचा राज्य सरकारने विचार करावा: नाना पटोले

महागाईनं जनता त्रस्त असून पेट्रोल, डिझेलचे दर अजूनही जास्तच आहेत. शेतकरी नेहमीच संकटाचा सामना करत असतो. शेतीसाठी ट्रॅक्टरचा वापरही मोठ्या प्रमाणावर केला जातो तसेच इतर शेती कामासाठीही डिझेलचा वापर केला जातो. सध्याचे डिझेलचे दर जास्त असून शेतकऱ्यांना परवडणारे नाहीत. राज्य सरकारने डिझेलवर शेतकऱ्यांना सबसिडी देण्याचा विचार करून बळीराजाला दिलासा द्यावा, अशी मागणी नाना पटोले यांनी आज विधानसभेत बोलताना केली.

Aug 18, 2022, 02:36 PMIST

Ashok Chavan: नव्या सरकारचे अर्ध्यापेक्षा जास्त निर्णय स्थगितीचे; अशोक चव्हाण यांचा आरोप

नवं सरकार अभिमानानं सांगते की आम्ही दीड महिन्यात ७०० निर्णय घेतले आहेत. पण ७०० निर्णयांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त निर्णय स्थगितीचे आहेत, असा टोला माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी आज शिंदे सरकारला हाणला. 'सरकार ही निरंतर प्रक्रिया असते. आधीच्या सरकारनं घेतलेले निर्णय हे जनहिताचेच होते, त्याला स्थगिती देणं चुकीचं आहे. सर्व कामांवरील स्थगिती उठवावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली.

Aug 18, 2022, 01:50 PMIST

Jayant Patil: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर झालेली सरकारी मदत कागदावरच; जयंत पाटील यांची टीका

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारनं जाहीर केलेली मदत अद्याप कागदावरच आहे. सरकारचं बोलणंच जास्त आणि काम शून्य आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. सरकार स्थिर करण्यात, नाराजांची मनधरणी करण्यात, खाते वाटून घेण्यात हे दंग आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांकडं, सामान्य जनतेकडं यांचं दुर्लक्ष झालं आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Aug 18, 2022, 01:50 PMIST

Chhagan Bhujbal: देशात सध्या सफेद दाढीचा प्रभाव; छगन भुजबळ यांची टोलेबाजी

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याचा मला आनंद आहे. राज्याच्या इतिहासात दाढीवाला मुख्यमंत्री पहिल्यांदाच झाला आहे. मात्र, त्यांची दाढी काळी आहे. काळी दाढी आणि सफेद दाढीमध्ये फरक आहे. काळ्या दाढीचा प्रभाव फक्त राज्यात आहे, पण सफेद दाढीचा प्रभाव देशभर आहे, अशी मिश्किल टिप्पणी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केली. त्यावेळी सभागृहात खसखस पिकली.

Aug 18, 2022, 12:55 PMIST

Bhaskar Jadhav: मध्ये मध्ये बोलणाऱ्या नीतेश राणे यांच्यावर भास्कर जाधव संतापले!

विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आपलं म्हणणं मांडत होते. त्यावेळी नितेश राणे यांनी बसूनच काहीतरी बोलत होते. त्यास भास्कर जाधव यांनी आक्षेप घेतला. मी मंत्र्यांशी बोलत आहे. अध्यक्ष महोदय, त्यांना काहीतरी शिकवा, अशी विनंती भास्कर जाधव यांनी अध्यक्षांना केली.

Aug 18, 2022, 12:13 PMIST

Ajit Pawar: अजित पवारांच्या प्रश्नावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत निरुत्तर

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पालघर जिल्ह्यातील हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसंदर्भात केलल्या प्रश्नांच्या भडीमाराची उत्तरे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना देता न आल्यानं शिंदे सरकारच्या कारकीर्दीतील पहिलाच प्रश्न उत्तरासाठी राखून ठेवण्याची नामुष्की शिंदे सरकारवर आली. आता या प्रश्नाचं उत्तर सरकारकडून सोमवारी दिले जाणार आहे.

Aug 18, 2022, 11:06 AMIST

Maha Vikas Aghadi: सरकारला लक्ष्य करण्यासाठी विरोधकांची आज नवी घोषणा

५० खोके, एकदम ओके… या घोषणेची भलतीच चर्चा राज्यात झाल्यानंतर आज विरोधकांनी नव्या घोषणेसह भाजप व एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना लक्ष्य केलं. गद्दारांना भाजपची ताटवाटी… चलो गुवाहाटी, चलो गुवाहाटी… अशा घोषणा विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर उभे राहून दिल्या. 

Aug 18, 2022, 10:45 AMIST

Maharashtra Assembly Session: दुसऱ्या दिवशीही विरोधकांची सरकारविरोधात घोषणाबाजी

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर निदर्शनं करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. ई़डी सरकार हाय हाय… शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… अशा घोषणा विरोधकांनी दिल्या.

Aug 18, 2022, 10:41 AMIST

Pune Mhada Lottery: पुणे मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या म्हाडाच्या ५२११ घरांसाठी ऑनलाइन सोडतीचा विधान भवनात शुभारंभ

पुणे मंडळ म्हाडाच्या ५२११ घरांच्या ऑनलाईन सोडतीचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे आज करण्यात आला. पुणे, पिंपरी-चिंचवडसह सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील ५२११ घरांसाठी म्हाडा ही सोडत काढत आहे. पुणे मंडळामार्फत म्हाडाच्या विविध योजनेतील २७८ सदनिका, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर असलेल्या म्हाडाच्या २८४५ सदनिका आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत २०८८ सदनिका अशा एकूण ५२११ सदनिकांच्या संगणकीय सोडतीचा आज शुभारंभ झाला.

Aug 18, 2022, 10:06 AMIST

Balasaheb Thorat: बाळासाहेब थोरात यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली आहे. माजी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला व मोहित कंबोज यांनी काल फडणवीसांची भेट घेतली होती. त्यावरून थोरात यांनी टीका केली आहे. फडणवीसांचा 'सागर' बंगला कदाचित वॉशिंग मशिनचं काम करत असेल, असं थोरात यांनी म्हटलं आहे.

Aug 18, 2022, 09:48 AMIST

Maharashtra Assembly Monsoon Session 2nd day: विधीमंडळ अधिवेशनाचा आज दुसरा दिवस

राज्य विधीमंडळाचा पहिला दिवस विरोधकांची घोषणाबाजी व आरोप-प्रत्यारोपांनी गाजला. आज दुसऱ्या दिवशी खऱ्या अर्थानं कामकाजाला सुरुवात होण्याची शक्यता असून विरोधकांनी राज्यांतील विविध प्रश्नांवर सरकारला घेरण्याची तयारी केली आहे.

    शेअर करा