Arvind Kejriwal on PM Narendra Modi : कथित मद्य घोटाळ्यात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक झाल्यानंतर आम आदमी पक्ष व भाजपमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. केवळ राजकीय सूड भावनेतून सिसोदिया यांच्यावर कारवाई झाल्याचा आम आदमी पक्षाचा आरोप आहे. निवडणुकीच्या मैदानात आम आदमी पक्षाला पराभूत करता येत नसल्यानं मोदी सरकार केंद्रीय यंत्रणांचा वापर करत आहे व विरोधकांना छळत आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली आहे. देशाचा पंतप्रधान किमान शिकलेला असायला हवा. तसे ते असते तर त्यांना शिक्षणाचं महत्त्व कळलं असतं. मनीष सिसोदिया यांनी केलेल्या कामाचं महत्त्व त्यांना कळलं असतं, असा सणसणीत टोला केजरीवाल यांनी हाणला.