भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज बुधवारी सेंट लॉरेन्स मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे. हे वृत्त लिहिपर्यंत भारताने २८ षटकांत ३ बाद १३५ धावा केल्या आहेत.
गेल्या सामन्यात ९१ धावांची शानदार खेळी करणारी स्मृती मानधना आज ४० धावांवर बाद झाली. तिने ५१ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकार ठोकला. या खेळीसह मंधानाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.
मिताली राजचा विक्रम मोडला
एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्मृती मंधाना सर्वात जलद ३ हजार धावा पूर्ण करणारी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. स्मृतीने ७६ एकदिवसीय डावात ३ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. यासह मंधानाने माजी कर्णधार मिताली राजचा मोठा विक्रम मोडला आहे. मितालीने ८८ डावांमध्ये वनडेमध्ये ३ हजार धावांचा टप्पा गाठला होता.
सर्वात जलद ३ हजार धावा पूर्ण करणारी स्मृती जगातील तिसरी खेळाडू
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ३ हजार धावा पूर्ण करणारी स्मृती ही जगातील तिसरी खेळाडू ठरली आहे. ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कने ६२ डावात आणि मेग लेगिंगने ६४ डावात अशी कामगिरी केली आहे.
वनडेमध्ये ३ हजार धावा करणारी तिसरी भारतीय महिला खेळाडू
एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३ हजार धावा पूर्ण करणारी स्मृती मंधाना तिसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. तिच्या आधी मिताली राज आणि भारतीय संघाची विद्यमान कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी अशी कामगिरी केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात मंधानाचे शतक ९ धावांनी हुकले होते. ९९ चेंडूत ९१ धावा करून ती बाद झाली होती. मालिकेतील पहिला सामना जिंकून भारतीय संघ १-० ने आघाडीवर आहे.
संबंधित बातम्या