मराठी बातम्या  /  क्रीडा  /  रेफ्रीने शीख फुटबॉलपटूला पगडी काढायला सांगितली, पुढं काय घडलं माहित्येय?

रेफ्रीने शीख फुटबॉलपटूला पगडी काढायला सांगितली, पुढं काय घडलं माहित्येय?

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 04, 2023 11:55 PM IST

Sikh Footballer Patka Controversy : फुटबॉल सामन्यादरम्यान एका शीख खेळाडू पटका काढण्यास सांगण्यात आले. यामुळे क्रिडा विश्वात मोठा वाद निर्माण होण्यासाची शक्यता आहे. ही घटना स्पेनमध्ये घडली आहे.

sikh footballer patka controversy football match
sikh footballer patka controversy football match

sikh footballer patka controversy football match : स्पेनमध्ये एका फुटबॉल सामन्यादरम्यान एक विचित्र वाद समोर आला आहे. यामुळे क्रीडा विश्वात मोठा गदारोळ माजण्याची शक्यता आहे. सामन्यात एका १५ वर्षीय शीख खेळाडूला त्याचा पटका काढण्यास सांगण्यात आले. यानंतर सहकारी खेळाडू आणि स्टाफने आपल्या शीख खेळाडूला पाठिंबा देत सामना खेळण्यास नकार दिला.

वास्तविक, स्पेनच्या देशांतर्गत स्पर्धेत अराटिया सी (Arratia C) आणि पडुरा डी अरिगोरियागा (Padura de Arrigorriaga) संघ यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात अरातिया सी संघाचा १५ वर्षीय शीख खेळाडू गुरप्रीत सिंगही खेळत होता. पण सामन्यात रेफ्रींनी गुरप्रीत सिंगला नियमांचा हवाला देत पटका काढण्यास सांगितले. पण गुरप्रीतने तसे करण्यास नकार दिला. पण रेफ्री त्याच्या म्हणण्यावर ठाम राहिले. दरम्यान, हा पटका गुरप्रीतच्या धर्माशी संबंधित असल्याचे अराटिया संघाच्या खेळाडूंनी रेफ्रींना सांगितले. पण पंचांनी त्यांचेही ऐकले नाही.

विरोधी संघानेही गुरप्रीतला पाठिंबा दिला

इतकंच नाही तर विरोधी संघाच्या पडुरा डी अरिगोरियागाच्या (Padura de Arrigorriaga) खेळाडूंनीही गुरप्रीत सिंगला साथ दिली. त्याला तेसे खेळू द्यावे, असेही त्यांनी रेफ्रींना समजावून सांगितले. मात्र रेफ्रींनी दोन्ही संघातील खेळाडू आणि स्टाफचे म्हणणे ऐकून घेतले नाही. यानंतर अरातीया संघानेच सामना खेळण्यास नकार दिला.

रेफ्री आपल्या भूमिकेवर ठाम राहिले

अरातियाचे अध्यक्ष पेड्रो ओरमाझबल म्हणाले, 'तो (गुरप्रीत) किमान ५ वर्षांपासून सामान्यपणे सामने खेळत आहे. आम्हाला अशी कोणतीही समस्या कधीच आली नाही. संपूर्ण वातावरण गुरप्रीतसाठी अपमानास्पद होते. सहकारी खेळाडूंनी रेफ्रींना समजावून सांगितले, पण रेफ्रींनी फक्त नियमांचा आग्रह धरला आणि गुरप्रीतला खेळू दिले नाही.

ओरमझाबल पुढे म्हणाले, 'नंतर सहकारी खेळाडूंनी एकजूट दाखवत मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. गुरप्रीतला विरोधी संघाचाही पाठिंबा मिळाला, पण रेफ्रींनी काहीही ऐकले नाही.

विशेष म्हणजे, FIFA च्या नियमानुसार, पुरुष फुटबॉल खेळाडू सामन्यादरम्यान पगडी घालू शकतात. या प्रकरणानंतर सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. गुरप्रीतला सर्वाधिक पाठिंबा मिळत आहे.

WhatsApp channel