मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Shikhar Dhawan: जे होतं, ते चांगल्यासाठी होतं… कर्णधारपदावरून काढताच शिखर धवन बोलला!

Shikhar Dhawan: जे होतं, ते चांगल्यासाठी होतं… कर्णधारपदावरून काढताच शिखर धवन बोलला!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Nov 24, 2022 11:38 AM IST

Shikhar Dhawan: झिम्बाब्वे विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी कर्णधारपदी निवड होऊन, नंतर पुन्हा काढण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर शिखर धवन यानं प्रतिक्रिया दिली आहे.

Shikhar Dhawan (Photo: PTI)
Shikhar Dhawan (Photo: PTI) (HT_PRINT)

Shikhar Dhawan On Being Removed As Captain: न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर टीम इंडियाचा सामना झिम्बाब्वे संघाशी होणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी शिखर धवन यांच्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली होती. मात्र, झिम्बाब्वे विरुद्धच्या मालिकेसाठी शेवटच्या क्षणी त्याला बदलून के. एल. राहुल याच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. निवड समितीच्या या निर्णयावर शिखरनं प्रतिक्रिया दिली आहे.

न्यूझीलंडमध्ये उद्यापासून सुरू होत असलेल्या वनडे मालिकेत शिखर धवन भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी देखील त्याचीच निवड झाली होती. मात्र, के एल राहुल फिट होऊन संघात परतल्यानंतर त्याच्याकडं नेतृत्व देण्यात आलं आहे. तडकाफडकी झालेल्या या बदलावर शिखर धवन यानं अत्यंत संयमी आणि प्रगल्भ प्रतिक्रिया दिली आहे. 

'माझ्या जागी राहुलला संधी देण्यात आल्याचं मला अजिबात वाईट वाटलेलं नाही. राहुल हा मुख्य संघाचा उपकर्णधार आहे. आशिया कपमध्ये रोहित नसता तर राहुललाच संधी मिळाली असती. त्यामुळं झिम्बाब्वे दौऱ्यासाठी त्याची नियुक्ती होण्यात काही वावगं नाही. त्यामुळं मला दु:ख होण्याचं काही कारण नाही. उलट मला अत्यंत तरुण वयात संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे, हे मी माझं भाग्य समजतो. हे एक आव्हान असतं आणि ते मी आनंदानं स्वीकारत आलोय. यापूर्वी निवड समिती व संघ व्यवस्थापनानं मला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत नेतृत्व करण्याची संधी दिली होती. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं मानणाऱ्यांपैकी मी आहे, असं शिखर म्हणाला.

शिखर धवन याला टीम इंडियाचं नेतृत्व करायला मिळण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी त्यानं वेस्ट इंडिज व दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत संघाचं नेतृत्व केलं होतं.

WhatsApp channel