मराठी बातम्या  /  क्रीडा  /  RCB vs KKR IPL 2023 : आयपीएलमधील कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये रंगणार सामना, विराट-रसेल एकमेकांसमोर भिडणार

RCB vs KKR IPL 2023 : आयपीएलमधील कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये रंगणार सामना, विराट-रसेल एकमेकांसमोर भिडणार

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 26, 2023 12:24 PM IST

RCB vs KKR IPL 2023 : विराट कोहली मागच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. त्यामुळं आता आजच्या सामन्यातील त्याच्या कामगिरीवर चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders
Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders (HT)

Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders : संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सला पराभवाची धूळ चारल्यानंतर आता विराट कोहलीच्या आरसीबीचा सामना नितीश राणाच्या केकेआरशी होणार आहे. सलग दोन सामने जिंकत आरसीबीने आयपीएलच्या प्लेऑफच्या दिशेनं प्रवास सुरू केला आहे. तर केकेआरचा सलग चार सामन्यात पराभव झाल्यामुळं संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता केकेआरला उरलेले सर्व सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. तर दुसरीकडे विराट कोहलीच्या आरसीबीने चार सामने जिंकत आयपीएलच्या गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. त्यामुळं आजचा सामना जिंकून प्लेऑफच्या शर्यतीत दावा पक्का करण्याचा प्रयत्न आरसीबीचा असणार आहे.

आरसीबीचा कर्णधार विराट कोहली राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. याशिवाय त्याला गेल्या दोन ते तीन सामन्यात चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळं आता आरसीबीचा आजचा विजय विराट कोहलीच्या कामगिरीवर अवलंबून असणार आहे. फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी चांगली फलंदाजी केली तर आरसीबीला मोठी आघाडी घेता येऊ शकते. दुसरीकडे केकेआरचा विस्फोटक फलंदाज आंद्रे रसेल हा यंदाच्या आयपीएलमध्ये फ्लॉप ठरत असल्यामुळं केकेआरची डोकेदुखी वाढली आहे. नितीश राणा, व्यंकटेश अय्यर आणि रिंकु सिंह हे फलंदाज फॉर्ममध्ये असले तर संघाला मधल्या फळीत कोणत्याही फलंदाजाने स्थैर्य प्राप्त करून दिलेलं नाही. त्यामुळं आजच्या सामन्यात विराट कोहली आणि आंद्रे रसेलच्या कामगिरीवर अनेकांचं लक्ष असणार आहे.

IPL 2023 Points Table : गुजरातच्या विजयाने आयपीएलच्या गुणतालिकेत मोठी उलटफेर, तुमचा आवडता संघ कितव्या स्थानी?

मधल्या फळीतील फलंदाजी ही दोन्ही संघांची अडचण...

यंदाच्या हंगामात आरसीबीचा कर्णधार विराट कोहली, फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल बाद झाल्यानंतर दिनेश कार्तिक-महिपाल लोमरोर यांना चांगली कामगिरी करता आलेली नाही. पहिल्या दहा षटकांमध्ये शंभरीपार केल्यानंतरही आरसीबीचा संघ दोनशे धावा करण्यात अनेकदा अपयशी ठरला आहे. केकेआरचीही अशीच काहीशी स्थिती आहे. कर्णधार नितीश राणा, रिंकु सिंह आणि व्यंकटेश अय्यर वगळता कोणत्याही फलंदाजाने चमकदार कामगिरी केलेली नाही. मधल्या फळीतील फलंदाजी हा विषय दोन्ही संघांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

WhatsApp channel