मराठी बातम्या  /  क्रीडा  /  RCB Vs GT Highlights : गुजरातनं आरसीबीला आयपीएलमधून बाहेर फेकलं, शुभमनचं शतकं विराटवर भारी

RCB Vs GT Highlights : गुजरातनं आरसीबीला आयपीएलमधून बाहेर फेकलं, शुभमनचं शतकं विराटवर भारी

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 21, 2023 06:47 PM IST

RCB Vs GT Score : आयपीएलचा ७० वा सामना आरसीबी आणि गुजरात यांच्यात झाला. या सामन्यात आरसीबीचा ६ विकेट्सने पराभव झाला. या पराभवानंतर आरसीबीचा संघ आयपीएलमधून बाहेर झाला आहे. तर मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे.

RCB Vs GT IPL Live Score
RCB Vs GT IPL Live Score

PL Live Cricket Score, RCB vs GT Indian Premier League 2023 : आयपीएलच्या १६व्या मोसमातील ७०व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (RCB) गुजरात टायटन्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेला हा सामना गुजरातने सहा गडी राखून जिंकला. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीने २० षटकात ५ विकेट गमावत १९७ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने १९.१ षटकांत चार गडी गमावून १९८ धावा केल्या. या पराभवानंतर आरसीबी संघ आयपीएलमधून बाहेर पडला आहे. तर मुंबई इंडियन्सला प्ले ऑफमध्ये स्थान मिळाले.

RCB Vs GT IPL Score updates

आरसीबीचा लाजिरवाणा पराभव

आयपीएलचे जेतेपद पटकावण्याचे आरसीबीचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. २१ मे (रविवार) रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आरसीबीचा गुजरात टायटन्सने सहा गडी राखून पराभव केला. आरसीबीच्या पराभवामुळे मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचली आहे.

लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात चांगली झाली नाही. गुजरातने ऋद्धिमान साहाची विकेट स्वस्तात गमावली. साहाला मोहम्मद सिराजने वेन पारनेलच्या हाती झेलबाद केले. येथून शुभमन गिल आणि विजय शंकर यांनी दुसऱ्या विकेटसाठी १२३ धावांची भागीदारी करत गुजरातला मजबूत स्थितीत आणले. शंकरने ३५ चेंडूंत ७ चौकार आणि दोन षटकारांसह ५३ धावा केल्या. शंकर बाद झाल्यानंतर गुजरातने दासून शनाका आणि डेव्हिड मिलर यांच्या विकेट्स स्वस्तात गमावल्या.

आरसीबीचा डाव

पाऊस आणि ओले मैदान यामुळे सामना ५५ मिनिटे उशिरा सुरू झाला. मात्र, या विलंबाचा आरसीबीचे सलामीवीर विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसवर कोणताही परिणाम झाला नाही. दोन्ही खेळाडूंनी मिळून ७.१ षटकात ६७ धावांची भागीदारी केली. नूर अहमदने डु प्लेसिसला बाद करून ही धोकादायक भागीदारी संपुष्टात आणली. कर्णधार डू प्लेसिसने १९ चेंडूंत २८ धावा केल्या, ज्यात पाच चौकारांचा समावेश होता.

यानंतर रशीद खानच्या गोलंदाजीवर ग्लेन मॅक्सवेलच्या (११ धावा) रूपाने आरसीबीने आपली दुसरी विकेट गमावली. त्यानंतर नूर अहमदने महिपाल लोमरोर (१ धाव) देखील बाद केले, ज्यामुळे आरसीबीची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात ८५ धावा झाली. येथून, मायकेल ब्रेसवेल आणि विराट कोहली यांच्यात ४७ धावांची भागीदारी झाली, ज्यामुळे आरसीबीच्या डावाला गती मिळाली. ब्रेसवेल बाद झाला पण कोहली शेवटपर्यंत क्रीजवर राहिला आणि त्याने शानदार शतक झळकावले.

विराट कोहलीने ६१ चेंडूत १३ चौकार आणि एका षटकारासह नाबाद १०१ धावा केल्या. कोहलीने सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावले आहे. यापूर्वी त्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्धही शतक (१०० धावा) केले होते. किंग कोहली आता आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करणारा खेळाडू बनला आहे. कोहलीने सहा शतके झळकावणाऱ्या ख्रिस गेलला मागे टाकले.

RCB Vs GT Live Score : शंकर-शनाका बाद

विजयकुमार वैशाकने आरसीबीला दुसरे यश मिळवून दिले. त्याने विजय शंकरला विराट कोहलीकरवी झेलबाद केले. शंकरने ३५ चेंडूत ५३ धावा केल्या. त्याने सात चौकार आणि दोन षटकार मारले. शंकरनंतर दासून शनाकाला फलंदाजीत फारसे काही करता आले नाही. १६व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. त्याला हर्षल पटेलने झेलबाद केले.

RCB Vs GT Live Score : साहा बाद

मोहम्मद सिराजने आरसीबीला पहिले यश मिळवून दिले. तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने ऋद्धिमान साहाला बाद केले. साहा १४ चेंडूत १२ धावा करून बाद झाला. वेन पारनेलने त्याचा झेल घेतला. गुजरात टायटन्सने चार षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात ३० धावा केल्या आहेत. शुभमन गिल नऊ आणि विजय शंकर चार धावा करून नाबाद आहेत.

RCB Vs GT Live Score : गुजरातला १९८ धावांचे लक्ष्य

आरसीबीने गुजरात टायटन्सला १९८ धावांचे लक्ष्य दिले आहे. त्यांनी २० षटकात ५ गडी बाद १९७ धावा केल्या आहेत. आरसीबीकडून विराट कोहलीने ६१ चेंडूत नाबाद १०१ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत १३ चौकार आणि १ षटकार लगावला. कर्णधार फाफ डुप्लेसिसने २८, मायकेल ब्रेसवेलने २६ आणि अनुज रावतने १५ चेंडूत नाबाद २३ धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेल ११ आणि महिपाल लोमरोर एका धावेवर बाद झाले. दिनेश कार्तिक खातेही उघडू शकला नाही. गुजरातकडून नूर अहमदने सर्वाधिक दोन बळी घेतले. मोहम्मद शमी, राशिद खान आणि यश दयाल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाला.

RCB Vs GT Live Score : विराट कोहलीचे शतक

आयपीएलच्या सलग दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावले आहे. विराटने गेल्या सामन्यात हैदराबादविरुद्ध नाबाद १०० धावांची खेळी केली होती. आयपीएलमधील कोहलीचे हे सातवे शतक आहे. तो स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक शतक ठोकणारा खेळाडू ठरला. विराटने त्याचा माजी साथीदार ख्रिस गेलचा सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडला आहे. आरसीबीचा माजी खेळाडू ख्रिस गेलने सहा शतके झळकावली होती.

RCB Vs GT Live Score : आरसीबीला चौथा धक्का

मोहम्मद शमीने आरसीबीला चौथा धक्का दिला. त्याने १४व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर मायकेल ब्रेसवेलला बाद केले. शमीने त्याचा झेल घेतला. ब्रेसवेलने १६ चेंडूत २६ धावा केल्या. त्याने पाच चौकार मारले.

RCB Vs GT Live Score : कोहलीचं अर्धशतक

विराट कोहलीने आयपीएलमधील ५१ वे अर्धशतक झळकावले आहे. त्याने १२व्या षटकातील पाचव्या चेंडूवर आपले अर्धशतक पूर्ण केले. आरसीबीने १२ षटकांत ३ गडी गमावून ११२ धावा केल्या आहेत. विराट कोहली ३६ चेंडूत ५२ आणि मायकेल ब्रेसवेल नऊ चेंडूत १५ धावांवर खेळत आहे.

RCB Vs GT Live Score : आरसीबीला दुसरा धक्का

राशिद खानने आरसीबीला दुसरा धक्का दिला. त्याने नवव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलला क्लीन बोल्ड केले. त्याने पाच चेंडूत ११ धावा केल्या. यादरम्यान त्याने एक चौकार आणि एक षटकार मारला. आरसीबीने नऊ षटकांत दोन गडी बाद ८२ धावा केल्या. विराट कोहली २७ चेंडूत ४१ तर महिपाल लोमरोने तीन चेंडूत एक धाव करून खेळत आहे.

RCB Vs GT Live Score : डुप्लेसिस बाद

आरसीबीला पहिला धक्का आठव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बसला. नूर अहमदने फाफ डुप्लेसिसची विकेट घेतली. डुप्लेसिस १९ चेंडूत २८ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार मारले. राहुल तेवतियाने डुप्लेसिसचा झेल घेतला. बाद होण्यापूर्वी त्याने विराट कोहलीसोबत पहिल्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली. डुपुईस बाद झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल क्रीजवर आहे.

RCB Vs GT Live Score : ६ षटकात ६२ धावा

आरसीबीच्या डावातील सहा षटके संपली आहे. त्यांनी बिनबाद ६२ धावा केल्या आहेत. विराट कोहली २२ चेंडूत ३६ आणि फाफ डुप्लेसिस १४ चेंडूत २५ धावांवर खेळत आहे. दोघांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.

RCB Vs GT Live Score : दोन्ही संघ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, फाफ डुप्लेसिस (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, अनुज रावत, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हर्षल पटेल, वेन पारनेल, मोहम्मद सिराज, विजय कुमार विशक.

गुजरात टायटन्स : शुभमन गिल, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (कर्णधार), दासून शनाका, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी, यश दयाल.

RCB Vs GT Live Score : आरसीबीची प्रथम फलंदाजी

गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आरसीबी संघ प्रथम फलंदाजी करेल. आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने संघात एक बदल केला. कर्ण शर्मा दुखापतीमुळे या सामन्यात खेळत नाहीये. त्यांच्या जागी हिमांशू शर्माला संधी देण्यात आली आहे. तो मुख्य प्लेइंग-11 मध्ये सामील झालेला नाही. त्याला पाच पर्यायी खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले आहे.

RCB Vs GT Live Score : थोड्याच वेळात टॉस

आरसीबीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बंगळुरूमध्ये पाऊस थांबला आहे आणि नाणेफेक थोड्या वेळाने होईल. नाणेफेक संध्याकाळी ७:४५ वाजता होईल आणि त्यानंतर १५ मिनिटांनी सामना सुरू होईल.

आरसीबीसाठी करो या मरोचा सामना

EPL 2023 च्या ६९व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा ८ विकेट्सने पराभव केला. या विजयासह मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. त्याचबरोबर मुंबईच्या विजयासह राजस्थानचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आता चौथ्या स्थानासाठी मुंबई आणि आरसीबी यांच्यात चुरस आहे.

आरसीबी-गुजरात सामना रद्द झाल्यास बंगळुरुचे १४ सामन्यांत केवळ १५ गुण होतील. दुसरीकडे, जर त्यांनी गुजरातला पराभूत केले तर त्यांचे १४ सामन्यांतून १६ गुण होतील आणि चांगल्या नेट रनरेटमुळे ते प्लेऑफमध्ये पोहोचतील. अशा स्थितीत मुंबईचा संघ पाचव्या क्रमांकावर घसरेल.

RCB Vs GT Live Score : टॉस उशीरानं

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यातील नाणेफेक पावसामुळे उशीरा होणार आहे. आयपीएलच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ही माहिती देण्यात आली आहे. हा सामना लवकरात लवकर सुरू व्हावा, अशी आरसीबी संघाची इच्छा आहे. सामना झाला नाही तर ती प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडू शकते.

RCB Vs GT Live Score : बंगळुरूमध्ये पाऊस

आरसीबीसाठी वाईट बातमी आहे. बंगळुरूमध्ये पाऊस पडत आहे. येथे दिवसभर पाऊस सुरू आहे. लोकांना वादळाचाही सामना करावा लागला. जर पाऊस सुरूच राहिला आणि सामना झाला नाही तर आरसीबीला एका गुणावर समाधान मानावे लागेल. अशा स्थितीत ती प्लेऑफच्या शर्यतीतूनही बाहेर पडू शकते.

WhatsApp channel