मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Swapnil Padale: कुस्तीचा सराव करताना पैलवानाचा हार्ट अटॅकमुळं मृत्यू; दुर्दैवी घटनेनं पुण्यात शोककळा

Swapnil Padale: कुस्तीचा सराव करताना पैलवानाचा हार्ट अटॅकमुळं मृत्यू; दुर्दैवी घटनेनं पुण्यात शोककळा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 08, 2023 04:26 PM IST

Wrestler Swapnil Padale : गेल्या काही दिवसांपासून स्वप्नील मारुंजीच्या तालिमीत कुस्तीचा सराव करत होता. नवख्या मुलांनाही तो कुस्तीचे धडे देत होता. त्याच्या निधनामुळं पुण्यात शोककळा पसरली आहे.

Wrestler Swapnil Padale Passed Away In Kothrud Pune
Wrestler Swapnil Padale Passed Away In Kothrud Pune (HT)

Wrestler Swapnil Padale Passed Away In Kothrud Pune : मोठ्या जल्लोषात पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी उत्साह संपत असतानाच आता पुण्यातून कुस्तीक्षेत्रासाठी वाईट बातमी समोर आली आहे. कुस्तीचा सराव करत असताना एका पैलवानाला ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळं त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. स्वप्नील पाडाळे असं हार्ट अटॅकमुळं मृत्यूमुखी पडलेल्या कुस्तीगीराचं नाव आहे. पैलवान स्वप्नीलच्या अकाली निधनामुळं पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्वप्नील पुण्यातील मारुंजीच्या मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात कुस्तीचा सराव करत होता. आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास तालिमीत कुस्तीचा सराव करत असतानाच त्याला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळं त्यानं घटनास्थळीच अखेरचा श्वास घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील पाडाळे हा गेल्या काही दिवसांपासून मारुंजीच्या मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात कुस्तीचा सराव करण्याबरोबर नवख्या तरुणांना कुस्तीचे धडेही शिकवत होता. स्वप्नील महाराष्ट्र चॅम्पियन राहिलेला असल्यामुळं त्याला अनेक कुस्तीगीर वस्ताद मानत होते. नेहमीप्रमाणे पहाटे लवकर उठून तो मारुंजीतील तालिमीत सरावासाठी आला होता. सपाट्या मारताना त्याला हार्ट अटॅकचा झटका आला आणि तो जमीनीवर कोसळला. त्यावेळी तेथील इतर पैलवानांना ही बाब लक्षात येताच त्यांनी स्वप्नीलला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता.

कुस्तीची पंढरी समजल्या जाणाऱ्या कोल्हापुरनंतर राज्यातील अनेक ठिकाणाहून तरुण कुस्तीचे धडे घेण्यासाठी पुण्यात दाखल होत असतात. नामवंत वस्ताद आणि अनेक माजी महाराष्ट्र केसरी कुस्तीपटूंचं मार्गदर्शन मिळत असल्यामुळं तरुणाई मोठ्या प्रमाणात कुस्ती या पारंपरिक खेळाकडे वळत आहे. परंतु आता पैलवान स्वप्नील पाडाळेचं अकाली निधन झाल्यामुळं कुस्तीक्षेत्रावर मोठी शोककळा पसरली आहे.

WhatsApp channel

विभाग