मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Maharashtra Kesari: पुण्यात रंगणार पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार!

Maharashtra Kesari: पुण्यात रंगणार पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 08, 2023 10:26 AM IST

Women's Maharashtra Kesari: पुण्यात पहिल्या महिल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.

(Photo Credit: Youtube)
(Photo Credit: Youtube)

Women's Maharashtra Kesari Updates: पुण्यात रंगलेल्या 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुण्याचा पैलवान शिवराज राक्षेने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला आस्मान दाखवत मानाची गदा जिंकली. याच पार्श्वभूमीवर महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. ही स्पर्धा पुण्यात होणार आहे. यामुळे या स्पर्धेचा पहिला बहुमान मिळवण्यासाठी राज्यातील महिला कुस्तीपटू मैदानात घाम गाळत आहेत. दरम्यान, कुस्ती महासंघाच्या सहयोगी समितीची घोषणा देखील करण्यात आल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काल अहमदनगरमध्ये दिली.

महाराष्ट्र केसरी पैलवानासाठीच्या चांदीच्या गदेला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. महाराष्ट्र केसरीला स्पर्धेला १९६१ साली सुरुवात झाली, तेव्हापासून चांदीची गदा दिली जाते. १९८२ सालापर्यंत ही गदा महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेच्या वतीने देण्यात येत होती. कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव माजी खासदार अशोक मोहोळ यांनी त्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र केसरी विजेत्यास गदा देण्याची परंपरा सुरू केली.

महाराष्ट्र केसरी ही माती व गादी दोन गटामध्ये होते. माती विभागातील विजेता व गादी विभागातील विजेता मल्ल यांच्यात महाराष्ट्र केसरी गदेसाठी अंतिम लढत होते. या लढतीमधील अंतिम विजेत्याला हा ‘महाराष्ट्र केसरी’ मान मिळतो. त्या मल्लास महाराष्ट्र केसरीची मानाची गदा बहाल केली जाते.

महाराष्ट्र केसरीसाठीच्या गदेची उंची जवळपास ३० इंच आहे. व्यास ९ ते १० इंच इतका असतो. वजन १० किलोपर्यंत असते. गदा संपूर्ण लाकडी असून, त्यावर चांदीचे नक्षीकाम केले जाते. 28 गेज चांदीचा पत्रा यासाठी वापरला जातो. या गदेवर कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांचे छायाचित्र असते.

WhatsApp channel