मराठी बातम्या  /  क्रीडा  /  KKR Captain : केकेआरची मोठी घोषणा! नरेन, रसेलऐवजी हा युवा खेळाडू संघाच्या कर्णधारपदी

KKR Captain : केकेआरची मोठी घोषणा! नरेन, रसेलऐवजी हा युवा खेळाडू संघाच्या कर्णधारपदी

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 27, 2023 05:55 PM IST

nitish rana captain kkr ipl 2023 : दुखापतीमुळे श्रेयस अय्यर आयपीएलच्या १६व्या मोसमात सहभागी होणार नाही. त्यामुळे केकेआरने नवा कर्णधार निवडला आहे.

nitish rana captain kkr ipl 2023
nitish rana captain kkr ipl 2023

कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या १६व्या हंगामासाठी नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. स्टार फलंदाज नितीश राणा आयपीएलच्या १६व्या हंगामात केकेआरची धुरा सांभाळताना दिसणार आहे. श्रेयस अय्यरच्या जागी नितीश राणाला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. दुखापतीमुळे अय्यर आयपीएलच्या १६व्या मोसमात सहभागी होऊ शकणार नाही.

नितीश राणा २०१८ पासून केकेआरशी जोडला गेला आहे. याआधी केकेआरचा नवा कर्णधार म्हणून शार्दुल ठाकूर, सुनील नरेन आणि आंद्रे रसेल यांचीही नावे समोर येत होती. मात्र फ्रँचायझीने भारतीय फलंदाजावर विश्वास व्यक्त करत त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. राणा पहिल्यांदाच आयपीएलमध्ये संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

फलंदाज म्हणून राणाचा आयपीएलमधील रेकॉर्ड खूपच चांगला राहिला आहे. नितीश राणाने २०१६ मध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले होते. त्याच्या दुसऱ्या सत्रातच राणाने ३०० हून अधिक धावा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तथापि, २०१८ च्या मेगा लिलावापूर्वी केकेआरने नितीश राणाला करारबद्ध केले होते. तेव्हापासून राणा फ्रँचायझीसाठी पाच हंगाम खेळला आहे.

राणाच्या आतापर्यंतच्या रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर त्याने ९१ सामन्यात २८ च्या सरासरीने २१८१ धावा केल्या आहेत. राणाने आयपीएलमध्ये १५ अर्धशतकेही झळकावली आहेत. मात्र, टॉप ऑर्डरमध्ये खेळूनही नितीशला अद्याप आयपीएलमध्ये शतक झळकावता आलेले नाही. २०२१ मध्ये, नितीश राणाला श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियासाठी वनडे आणि टी-20 पदार्पण करण्याची संधी मिळाली.

श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे राणाला संघाची कमान मिळाली. गेल्या वर्षी केकेआरने अय्यरला कर्णधार म्हणून संघाशी जोडले होते. मात्र गेल्या वर्षभरात अय्यरला पाठदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. अलीकडेच, ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत अय्यरला पाठदुखीचा त्रास वाढला. आता त्याला मैदानात परतण्यासाठी ६ महिन्यांहून अधिक कालावधी लागू शकतो.

WhatsApp channel

संबंधित बातम्या