मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND W vs ENG W T20 Highlights : विश्वचषकात भारताचा पहिला पराभव, रोमहर्षक सामन्यात इंग्लंडने हरवलं

IND W vs ENG W T20 Highlights : विश्वचषकात भारताचा पहिला पराभव, रोमहर्षक सामन्यात इंग्लंडने हरवलं

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 18, 2023 06:15 PM IST

IND W vs ENG W T20 World Cup Score News in Marathi : दक्षिण आफ्रिकेत महिला टी-20 वर्ल्डकप सुरू आहे. या स्पर्धेत आज (१८ फेब्रुवारी) भारताचा सामना इंग्लंडशी झाला. या सामन्यात टीम इंडियाचा ११ धावांनी पराभव झाला.

IND W vs ENG W T20 Highlights
IND W vs ENG W T20 Highlights

IND W vs ENG W T20 World Cup Score News in Marathi : महिला T20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने भारताचा ११ धावांनी पराभव केला आहे. ब गटात भारतीय संघाला विजयाची हॅट्ट्रिक करता आली नाही. भारताने आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला आणि नंतर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव केला होता. या स्पर्धेतील टीम इंडियाचा हा पहिलाच पराभव आहे. वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकूरचे ५ बळी आणि सलामीवीर फलंदाज स्मृती मानधनाच्या ५२ धावा टीम इंडियाच्या कामी आल्या नाहीत.

भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंडने २० षटकांत ७ बाद १५१ धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाला २० षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात १४० धावाच करता आल्या. टीम इंडियाचा पुढचा सामना आता आयर्लंडशी होणार आहे. हा सामना सोमवारी (२० फेब्रुवारी) भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६.३० वाजता खेळवला जाईल.

या सामन्यात इंग्लंडकडून नताली सीव्हरने सर्वाधिक ५० धावा केल्या. तिला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. इंग्लंडचा या स्पर्धेतील हा सलग तिसरा विजय आहे. यापूर्वी त्यांनी वेस्ट इंडिज आणि आयर्लंड संघाचा पराभव केला होता. इंग्लंडचा गटातील शेवटचा सामना २१ फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. 

गुणतालिकेत इंग्लंड तीन सामन्यांत तीन विजयांसह अव्वल स्थानावर आहे. त्यांचे ६ अंक आहेत. तीन सामन्यांत दोन विजयांसह भारत दुसऱ्या स्थानावर आहे. भारताचे ४ गुण आहेत. पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज संघ अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. दोघांचे प्रत्येकी २ गुण आहेत. आयर्लंडने तीनपैकी तीनही सामने गमावले आहेत.

 

india vs England Womens T20 World Cup Updates

IND W vs ENG W T20 Live : भारताला १२ चेंडूत ३४ धावांची आवश्यकता

भारताला १२ चेंडूत ३४ धावांची आवश्यकता आहे. रिचा घोष आणि दीप्ती शर्मा मैदानात आहेत.

IND W vs ENG W T20 Live : मानधना बाद

अर्धशतक झळकावल्यानंतर पुढच्याच चेंडूवर स्मृती मानधना बाद झाली. मंधाना षटकार मारण्याच्या प्रयत्नात पॅव्हेलियनमध्ये परतली. सारा ग्लेनच्या चेंडूवर नताली सीव्हरने तिचा झेल घेतला. मानधनाने ४१ चेंडूत ५२ धावा केल्या. तिने आपल्या खेळीत सात चौकार आणि एक षटकार लगावला. भारताला २४ चेंडूत ४७ धावांची गरज आहे. दीप्ती शर्मा आणि रिचा घोष मैदानात आहेत.

IND W vs ENG W T20 Live : हरमनप्रीत कौर बाद

६२ धावांवरर भारताला सर्वात मोठा धक्का बसला. कर्णधार हरमनप्रीत कौर मोठा फटका खेळण्याच्या नादात झेलबाद झाली. हरमनप्रीतने ६ चेंडूत २ धावा केल्या. भारताच्या आता ३ बाद ६४ धावा झाल्या आहेत. भारताला सामना जिंकण्यासाठी ५४ चेंडूत ८८ धावांची आवश्यकता आहे. स्मृती मानधना ३४ आणि रिषा घोष एका धावेवर खेळत आहे.

IND W vs ENG W T20 Live : जेमीमा बाद

१०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर भारताला दुसरा धक्का बसला. जेमिमा रॉड्रिग्ज षटकार मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाली. तिने १६ चेंडूत १३ धावा केल्या. सारा ग्लेनच्या गोलंदाजीवर कॅथरीन ब्रंटने तिचा झेल घेतला.

IND W vs ENG W T20 Live : भारताला पहिला धक्का

शेफाली वर्मा बाद झाली आहे. तिला लॉरेन बेलने बाद केले. चौकार मारण्याच्या प्रयत्नात शेफाली झेलबाद झाली. कॅथरीन सीव्हरने तिचा झेल घेतला. शेफालीने ११ चेंडूत ८ धावा केल्या. भारताने ४ षटकात एक विकेट गमावत २९ धावा केल्या आहेत. स्मृती मानधना १३ चेंडूत १८ धावा करून खेळत आहे. जेमिमा रॉड्रिग्ज क्रीझवर आली आहे.

IND W vs ENG W T20 Live score : इंग्लंडच्या २० षटकात १५१ धावा

इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी २० षटकात १५२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने निर्धारित २० षटकात ७ बाद १५१ धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडकडून अनुभवी फलंदाज नताली सीव्हरने सर्वाधिक ५० धावा केल्या. सीव्हरने ४२ चेंडूत ५ चौकार मारले. तिच्याशिवाय यष्टिरक्षक फलंदाज अॅमी जोन्सने २७ चेंडूत ४० धावांची दमदार खेळी केली. कर्णधार हीदर नाइटने २३ चेंडूत २८ धावा केल्या. तर सोफी एक्लेस्टोन ८ चेंडूत ११ धावा करून नाबाद राहिली. डॅनियल यट आणि कॅथरीन स्क्रिव्हर यांना खातेही उघडता आले नाही. अॅलिस कॅप्सीने ३  धावा केल्या. 

तर भारताकडून रेणुका सिंह ठाकूरने घातक गोलंदाजी करताना ४ षटकात १५ धावा देत ५ बळी घेतले. रेणुका व्यतिरिक्त शिखा पांडे आणि दीप्ती शर्मा यांना प्रत्येकी १ विकेट मिळाला.

IND W vs ENG W T20 Live: इंग्लंडला पाचवा धक्का

दीप्ती शर्माने इंग्लंडला पाचवा धक्का दिला. तिने १७व्या षटकातील पाचव्या चेंडूवर नताली सीव्हरला बाद केले. सीव्हरने ४२ चेंडूत ५० धावांची शानदार खेळी केली. तिचा झेल स्मृती मानधना हिने घेतला. इंग्लंडने १७ षटकांत ५ विकेट गमावत १२० धावा केल्या आहेत. एमी जोन्स १८ चेंडूत २६ धावा करून खेळत आहे. 

IND W vs ENG W T20 Live score : कर्णधार हीदर नाइट बाद

८० धावांवर इंग्लंडला चौथा धक्का बसला आहे. शिखा पांडेने १०व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर इंग्लंडची कर्णधार हीदर नाइटला बाद केले. शेफाली वर्माने नाइटचा झेल पकडला. हीदर नाइटने २३ चेंडूत २८ धावा केल्या. तिने ४ चौकार मारले.

IND W vs ENG W T20 Live : आठ षटकांनंतर इंग्लंडचा स्कोअर ४९/३

इंग्लंडच्या डावातील ८ षटके संपली आहेत. त्यांनी तीन गडी गमावून ४९ धावा केल्या आहेत. नताली सीव्हर १६ चेंडूत २४ आणि कर्णधार हीथर नाइट १५  चेंडूत ११ धावांवर खेळत आहे.

IND W vs ENG W T20 Live score: इंग्लंडला तिसरा धक्का बसला

रेणुका सिंह ठाकूरने इंग्लंड संघाला तिसरा धक्का दिला. डावाच्या पाचव्या षटकातील चौथ्या चेंडूवर तिने सोफिया डंकलीला क्लीन बोल्ड केले. डंकलेने ११ चेंडूत १० धावा केल्या. इंग्लंडने ५ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात २९ धावा केल्या आहेत.

IND W vs ENG W T20 Live : इंग्लंडला दुसरा धक्का 

रेणुका सिंग ठाकूरला सलग दुसऱ्या षटकात यश मिळाले आहे. डावाच्या तिसऱ्या षटकात तिने एलिस कॅप्सीला क्लीन बोल्ड केले. कॅप्सीने ६ चेंडूत ३ धावा केल्या. ती बाद झाल्यानंतर अनुभवी खेळाडू नताली सीव्हर क्रीझवर आली आहे. तर सोफिया डंकले सहा चेंडूत ६ धावा करुन खेळत आहे. इंग्लंडने दोन गड्यांच्या मोबदल्यात १० धावा केल्या आहेत.

IND W vs ENG W T20 Live: इंग्लंडला पहिला धक्का

रेणुका सिंग ठाकूरने पहिल्याच षटकात भारताला पहिला यश मिळवून दिले आहे. तिने तिसऱ्या चेंडूवर इंग्लंडचा सलामीवीर डॅनियल वॅटला बाद केले. वॅटने केवळ एका चेंडूचा सामना केला. तिला खातेही उघडता आले नाही. ती बाद झाल्यानंतर एलिस कॅप्सी क्रीजवर आली आहे.

IND W vs ENG W T20 Live : दोन्ही संघ

इंग्लंड

सोफिया डंकले, डॅनिएल येट, एलिस कॅप्सी, नताली सायव्हर, हेदर नाइट (कर्णधार), एमी जोन्स (विकेटकीपर), कॅथरीन सायव्हर, सोफी एक्लेस्टोन, चार्लोट डीन, सारा ग्लेन, लॉरेन बेल.

भारत

शेफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (विकेटकीपर), शिखा पांडे, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका ठाकूर सिंग.

IND W vs ENG W T20 Live: भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करेल

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने इंग्लंडविरुद्ध नाणेफेक जिंकली आहे. तिने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने हा सामना जिंकला तर ते थेट उपांत्य फेरीत प्रवेश करतील. हरमनने संघात एक बदल केला आहे. देविका वैद्यच्या जागी शिखा पांडेला स्थान मिळाले आहे.

WhatsApp channel