मराठी बातम्या  /  क्रीडा  /   GTvsRCB: गुजरातच्या पराभवामुळं हार्दिक पंड्या नाराज, म्हणाला…

GTvsRCB: गुजरातच्या पराभवामुळं हार्दिक पंड्या नाराज, म्हणाला…

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 20, 2022 11:06 AM IST

आरसीबी विरुद्धच्या सामन्यात झालेल्या पराभवामुळं गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या नाराज झाला आहे.

हार्दिक पंड्या
हार्दिक पंड्या (PTI)

आयपीएल स्पर्धेतील चुरस आणि थरार दिवसागणिक वाढत चालला आहे. प्ले ऑफमध्ये जागा निश्चित करण्यासाठी प्रत्येक संघानं जोमानं मैदानात उतरत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं (RCB) गुरुवारी गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) ८ गडी राखून पराभव करत स्पर्धेतील आपलं आव्हान कायम राखलं. या पराभवामुळं गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) नाराज झाला. त्यानं आपल्या संघ सहकाऱ्यांना फटकारलं.

‘आम्हाला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली नाही. आणखी काही धावा झाल्या असत्या तर सामन्याचं पारडं फिरू शकलं असतं. आम्ही लागोपाठ विकेट गमावल्या. पुढच्या सामन्यांमध्ये आम्हाला हे टाळावं लागणार आहे. प्ले ऑफमध्ये खेळताना लवकर विकेट टाकणं परवडणारं नाही. हा सामना आमच्यासाठी एक धडा आहे आणि आम्ही त्याकडं तसंच पाहतो,' असं हार्दिक पंड्या म्हणाल्या.

गोलंदाजीच्या आघाडीवरही गुजरातला फार काही करता आलं नाही याची खंतही हार्दिकनं व्यक्त केली. ‘वेगात बदल करून धावा रोखण्याचा आमचा प्रयत्न होता. मात्र, त्यात आम्हाला यश आलं नाही,’ असं तो म्हणाला. हार्दिक पंड्यानं कालच्या सामन्यात ४७ चेंडूंमध्ये ६२ धावा कुटल्या. हार्दिकची ही खेळी त्याचा आत्मविश्वास वाढवणारी ठरणार आहे. 

बंगळुरूनं गुरुवारचा सामना मोठ्या फरकानं जिंकत स्पर्धेतील आपलं आव्हान कायम राखलं आहे. आरसीबीनं आतापर्यंत १४ सामने खेळले असून त्यांचे १६ गुण झाले आहेत. बंगळुरूचा प्ले ऑफमधील प्रवेश मुंबई आणि दिल्ली संघातील सामन्याच्या निकालावर अवलंबून आहे. या सामन्यात दिल्लीचा पराभव झाल्यास बंगळुरूचा प्ले ऑफचा मार्ग मोकळा होणार आहे.

सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स स्पर्धेतून बाहेर गेले आहेत. या दोन्ही संघांना केवळ १२ गुण मिळवता आले आहेत. या दोन्ही संघांना अजूनही एकेक सामना खेळायचा असला तरी त्यातून गुणतालिकेवर फार फरक पडणार नाही. कारण, सामना जिंकणाऱ्या संघाचे एकूण गुण १४ होणार आहेत. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स हे प्रमुख संघ आधीच स्पर्धेबाहेर फेकले गेले आहेत. 

WhatsApp channel

विभाग