Rohit & Kohli: वय वाढलं म्हणून बाहेर काढणार का? वेंगसरकरांनी एका वाक्यात लाखो मनं जिंकली
Dilip Vengsarkar on Rohit Sharma & Virat Kohli: भारतीय संघाचे माजी निवडकर्ते दिलीप वेंगसरकर यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहलीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत संघाचा भाग नसलेल्या रोहित आणि कोहलीबाबत ते म्हणाले की, त्यांच्यात अजूनही खूप क्रिकेट शिल्लक आहे. वेंगसरकर यांच्या या वक्तव्याने त्यांनी अनेक क्रिकेट रसिकांची मने जिंकली आहेत.
श्रीलंकेविरुद्धच्या T20I मालिकेत रोहित शर्मा दुखापतीमुळे संघाचा भाग नव्हता, पण राहुल आणि विराट कोहली यांच्याबाबत बीसीसीआयने कोणतीही माहिती दिली नव्हती. त्या दोघांनी ब्रेक घेतला होता की टी-20 फॉरमॅटमध्ये त्यांची निवड करण्यात आली नव्हती, हा एक गुढ प्रश्नच आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मात्र, त्यानंतर अशा बातम्या येऊ लागल्या की, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची आता टी-20 मध्ये निवड होणार नाही. परंतु माजी निवडकर्ते दिलीप वेंगसरकर हे मान्य करायला तयार नाहीत. त्यांना वाटते की विराट आणि रोहित हे टीम इंडियाचे महत्त्वाचे भाग आहेत. दिलीप वेंगसरकर यांना रोहित आणि विराटच्या टी-२० मधील भविष्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्यांनी हे उत्तर दिले आहे. त्यांच्या उत्तराने त्यांनी अनेक चाहत्यांची मने जिंकली आहेत.
वय वाढलं म्हणून खेळाडूंना बाहेर काढू शकत नाही- वेंगसरकर
वेंगसरकर हे मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते. ते म्हणाले की, “संघात अनेक युवा खेळाडू येत आहेत. पण या दोन्ही खेळाडूंचे संघातील स्थान सुरक्षित आहे. दोघांनीही भारतीय संघासाठी खूप काही केले आहे, दोघेही तंदुरुस्त आहेत आणि त्यांच्या आणखी भरपूर क्रिकेट बाकी आहे”.
तसेच, वेंगसरकर पुढे बोलताना म्हणाले क, “मला वाटते की जेव्हा मोठे इव्हेंट्स होतील तेव्हा ते संघात परततील. रोहित आणि विराट भारताच्या कसोटी संघाचे एक महत्त्वाचे भाग आहेत आणि मला खात्री आहे की दोघेही खेळत राहतील. मी दोघांचा मोठा चाहता आहे. मात्र, भारतीय संघ मॅनेजमेंटने भविष्याचाही विचार करायला हवा, असेही ते म्हणाले. खेळाडूंसाठी वय हे मापदंड असू शकत नाही. रोहित आणि विराट हे मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या राष्ट्रीय संघात खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहेत".