मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ashwath Kaushik Chess : ८ वर्षांच्या अश्वथ कौशिकने इतिहास रचला, पाच पट मोठ्या बुद्धीबळ ग्रँडमास्टरला हरवलं

Ashwath Kaushik Chess : ८ वर्षांच्या अश्वथ कौशिकने इतिहास रचला, पाच पट मोठ्या बुद्धीबळ ग्रँडमास्टरला हरवलं

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 20, 2024 10:28 PM IST

Ashwath Kaushik Chess : भारतीय वंशाच्या 8 वर्षांच्या मुलाने पोलंडच्या ग्रँडमास्टरचा पराभव केला. हा ८ वर्षांचा मुलगा बुद्धिबळात सिंगापूरचे प्रतिनिधित्व करत होता. या मुलाच्या विजयाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

Ashwath Kaushik Chess
Ashwath Kaushik Chess (X)

Ashwath Kaushik Beat grandmaster Jacek Stopa : भारतीय वंशाच्या ८ वर्षीय मुलाने बुद्धीबळ स्पर्धेत इतिहास रचला आहे. अश्वथ कौशिक असे या चिमुरड्याचे नाव असून त्याने एका बुद्धीबळ स्पर्धेत पोलंडचा ग्रँडमास्टर जेसेक स्टॉपाचा पराभव केला. विशेष म्हणजे ग्रँडमास्टर जेसेक स्टॉपा हा अश्वतपेक्षा पाच पटीने मोठा आहे.

वास्तविक, ८ वर्षीय अश्वत कौशिकने रविवारी (१८ फेब्रुवारी) स्वित्झर्लंडमधील बर्गडॉर्फर स्टॅडथॉस ओपन स्पर्धेत पोलंडचा चेस ग्रँडमास्टर जेसेक स्टॉपाचा पराभव केला. अशाप्रकारे अश्वत कौशिक क्लासिकल बुद्धिबळात एका ग्रँडमास्टरला पराभूत करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे.

अश्वथ कौशिक या स्पर्धेत सिंगापूरकडून खेळत होता. अश्वथ कौशिकने ३७ वर्षीय जेसेक स्टोपाचा पराभव केला.

दरम्यान, अश्वथ कौशिक हा २०२२ मध्ये ८ वर्षांखालील इस्टर्न एशिया युथ चॅम्पियनशिपमध्ये ट्रिपल चॅम्पियन बनला होता, त्यावेळेसही तो चांगलाच चर्चेत आला होता.

अश्वथ कौशिक चेस वर्ल्ड रँकिंगमध्ये ३७,३३८ व्या स्थानावर

फिडे (FIDE) वर्ल्ड रँकिंगमध्ये अश्वथ कौशिक ३७,३३८ व्या स्थानावर आहे. २०१७ मध्ये तो सिंगापूरला गेला होता. तो म्हणाला, 'माझ्या खेळाचा आणि मी ज्या प्रकारे कामगिरी केली त्याचा मला अभिमान आहे, विशेषत: सामन्यात मी एका वेळी खूप वाईट परिस्थितीत होतो पण तेथून चांगले पुनरागमन करण्यात यशस्वी झालो.'

सिंगापूर चेस फेडरेशनकडून अश्वथचं कौतुक

सिंगापूरचे ग्रँडमास्टर आणि सिंगापूर चेस फेडरेशनचे सीईओ केविन गोह यांनी अश्वथच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. त्यांनी याबाबत 'X' वर लिहिले, की 'त्याच्या वडिलांनी त्याला खूप मदत केली आहे. हा मुलगा खूपच डेडिकेटेड आहे, त्याच्याकडे नक्कीच नैसर्गिक टॅलेंट आहे.' पण तो किती पुढे जाऊ शकतो हे पाहणे अद्याप बाकी आहे. कारण मुलगा जसजसा मोठा होतो तसतसे त्याच्या आवडी बदलू शकतात. तरीही आम्ही आशावादी आहोत."

WhatsApp channel

विभाग