Dharma News : या मंदिरात प्रवेश करण्याआधी भक्तांच्या डोळ्यावर बांधली जाते पट्टी
Mysterious Temple In India : आज आपण अशा एका मंदिराबाबत बोलणार आहोत ज्या मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी भक्तांचे डोळे बांधले जातात आणि त्यांना मंदिरात प्रवेश दिला जातो.
आपल्या देशातली काही मंदिरं आजही गूढ गोष्टींंनी भरलेली पाहायला मिळतात. अनेक मंदिरांचे दरवाजे वर्षातल्या अत्यंत कमी कालावधीसाठी उघडले जातात. सध्या चार धाम यात्रा सुरू आहे. चारधामच्या यात्रेत केदारनाथाच्या देवळाचे दरवाजे सध्या उघडण्यात आले आहेत, मात्र सहा महिन्यांनी पुढच्या सहा महिन्यांसाठी हे दरवाजे कायमचे बंद राहातील. इथं भगवंत आराम करतात असं सांगितलं जातं. आपल्या देशात पुरीचा जगन्नाथ वर्षातला एक दिवस देवळाच्या बाहेर पडतो आणि भक्तांना दर्शन द्यायला जातो.
ट्रेंडिंग न्यूज
आज आपण अशा एका मंदिराबाबत बोलणार आहोत ज्या मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी भक्तांचे डोळे बांधले जातात आणि त्यांना मंदिरात प्रवेश दिला जातो. वाचून थोडं आश्चर्य वाटत असेल, मात्र हे खरं आहे.
कुठे आहे हे मंदिर?
हे विचित्र मंदिर उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील देवल ब्लॉकमधील वाना येथे पाहायला मिळतं. लाटू मंदिर या नावाने हे मंदिर ओळखलं जातं. इथं लाटू नामक देवतेची पूजा केली जाते. स्थानिक लोक लाटू देवतेला उत्तराखंडच्या नंदा देवीचे धार्मिक भाऊ मानतात आणि त्यांची अपार भक्तीभावाने पूजा करतात.
मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी का बांधले जातात डोळे?
हिंदू आख्यायिकेमध्ये नाग आणि त्याचा नागमणी याचा उल्लेख आढळतोय. असं मानलं जातं की, लाटू मंदिरात हेच नागराज आपले रत्न घेऊन बसले आहेत आणि या रत्नाचा तेजस्वी प्रकाश कोणत्याही भक्ताच्या डोळ्याचा प्रकाश घालवण्यास पुरेसा आहे. भक्तांना आंधळेपण येऊ शकतं अशी इथे श्रद्धा आहे.त्यामुळे मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी पुजारी भाविकांच्या डोळ्यावर पट्टी बांधतात.
कधी उघडतात या मंदिराचे दरवाजे?
या लाटू मंदिराचे दरवाजे वैशाख महिन्यातल्या पौर्णिमेला उघडले जातात. सर्व भक्त दुरूनच देवतेचे दर्शन घेतात. या दरम्यान मंदिराचे पुजारी डोळ्यांवर पट्टी बांधून सर्वांची पूजा करतात. यावेळेस मंदिरात विष्णु सहस्त्रनाम आणि भगवती चंडिका हे पाठ केले जातात. मार्गशीर्ष अमावस्येला मंदिराचे दरवाजे बंद केले जातात.
मग तुम्हालाही या प्रसिद्ध आणि विचित्र मंदिरात यायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला चमोली गाठावे लागेल. लाटूसाठी दिल्लीहून बसने प्रवास करावा लागेल किंवा ऋषिकेशमार्गे तुम्हाला सुमारे ४६५ किलोमीटरचा प्रवास करावा लागेल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या
विभाग