शिर्डीचे देवस्थान हे केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. साई बाबांचा जन्म १९ व्या शतकाच्या सुरूवातीला झाला होता, असे मानले जाते. साई बाबांनी त्यांचे बहुतेक आयुष्य हे शिर्डीमध्ये घालवले होते.
अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी ह्या गांवात साईबाबांचे भव्य-दिव्य मंदिर आहे. शिर्डीमध्ये साईबाबांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांना 'शिर्डीचे साईबाबा' असे ओळखले जाते. साईबाबांनी शिर्डीमध्ये ६० वर्षे राहून मानवजातीची सेवा केली होती. येथूनच जगाला मानवता, कल्याण आणि एकात्मतेची अमूल्य शिकवण साईबाबांनी दिली. साईबाबांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या भूमीत साईबाबांनी श्रद्धा आणि सबुरीचा महामंत्र दिला होता.
साईबाबांच्या शिर्डीत तीन दिवस चालणाऱ्या श्रीरामनवमी उत्सवाची साई संस्थानच्यावतीनं जय्यत तयारी करण्यात आलीय. शिर्डी साईबाबा संस्थानच्यावतीनं १६ ते १८ एप्रिल असा तीन दिवसीय श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवाला शतकाची परंपरा असून साक्षात साईबाबांच्या आज्ञेने हा उत्सव सुरू झाला आहे. त्यामुळे त्यास अनन्य साधारण महत्त्व आहे.
यंदाच्या वर्षी ११३ वा श्रीरामनवमी उत्सव असल्यानं लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी या तीन दिवसात येणार आहे. या उत्सवासाठी देश-विदेशातून लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येणार आहे. त्याच बरोबर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून शेकडो पायी पालख्या श्रीरामनवमी उत्सवासाठी शिर्डीत दाखल होणार असल्यानं या सर्व भाविकांची राहण्याची, जेवणाची तसेच कडक्याचा उन्हाळा असल्यानं ठिकठिकाणी मंडप व्यवस्था तसेच पिण्याचा पाण्याची व्यवस्था साईबाबा संस्थानच्यावतीनं करण्यात आली आहे.
उत्सवाच्या मुख्य दिवशी १७ एप्रिल रोजी साईबाबांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात आले असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे.
साई बाबांच्या मुख्य मंदिरातील गाभारा हा सोन्याने मढवला असून, मंदिराचा कळस देखील सोन्याचा आहे. साई बाबांच्या मुख्य मंदिरात साईबाबांची एक आजीवन संगमरवरी मूर्ती आहे. ही मूर्ती ध्यानस्थ मुद्रेमध्ये बसली असून मूर्तीचा उजवा हात हा आशीर्वादासाठी आणि डावा हात मांडीवर आहे.
संपूर्ण वर्षभर महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश आदी राज्यांमधून मोठ्या संख्येने पालख्या शिर्डीत येतात. अशाप्रकारे गेल्या काही वर्षांपासून साईंची पालखी घेऊन येणारे साईभक्त पदयात्री हे या श्रीरामनवमी उत्सवाचे आकर्षण ठरत आहे. दर गुरुवारी देखील शिर्डीमध्ये साईबाबांची पालखी निघते. या पालखीमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांची रखडलेली कामे, दु:खे, वेदना, चिंता दूर होतात असे मानले जाते.