मराठी बातम्या  /  धर्म  /  Jaya Ekadashi 2023 : वाचा जया एकदशीची सुफल कहाणी, भगवान विष्णूंचं करा स्मरण

Jaya Ekadashi 2023 : वाचा जया एकदशीची सुफल कहाणी, भगवान विष्णूंचं करा स्मरण

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Feb 01, 2023 06:31 AM IST

Jaya Ekadashi Katha : भगवान विष्णू प्रसन्न झाल्यास इच्छित फल मिळतं असंही सांगितलं जातं. आज आपण जया एकादशीच्या निमित्तानं या एकादशीचं महत्व सांगणारी व्रतकथा पाहाणार आहोत.

जया एकादशीची कथा
जया एकादशीची कथा (हिंदुस्तान टाइम्स)

Jaya Ekadashi 2023

जया एकादशी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच १ फेब्रुवारी २०२३ रोजी साजरी केली जात आहे. आज जया एकादशीनिमित्त उपवास केला आणि जया एकादशीची व्रतकथा ऐकली तर पुण्य प्राप्त होतं असं सांगितलं गेलं आहे. जया एकादशीनिमित्त फक्त फलाहार करावा आणि भगवान विष्णूचं नामस्मरण करावं असं धर्मशास्त्रात सांगण्यात आलं आहे. भगवान विष्णू प्रसन्न झाल्यास इच्छित फल मिळतं असंही सांगितलं जातं. आज आपण जया एकादशीच्या निमित्तानं या एकादशीचं महत्व सांगणारी व्रतकथा पाहाणार आहोत.

एकदा नंदन वनामध्ये उत्सव होत होता. या उत्सवात देव,गंधर्व आणि दिव्य पुरुष आमंत्रित होते. एकीकडे गंधर्व गायन करत होते तर दुसरीकडे गंधर्व कन्या नृत्य करत होत्या. अचानक तिथं गंधर्व मल्यवान आणि पुष्यवती नाचू लागले. दोघेही एकमेकांवर मोहित झाले आणि त्यांनी सभ्यतेच्या सर्व मर्यादा सोडत नृत्य केलं.

हे पाहून देवराज इंद्र रागावला. त्याने त्या दोघांना स्वर्गापासून वंचित होऊन पृथ्वीवर राहण्याचा शाप दिला. मल्यवान आणि पुष्यवती यांना मृत्यूलोकात पिशाच्च योनी मिळाली. दोघेही हिमालयावरील झाडावर राहू लागले, त्यांचे जीवन दुःखांनी भरलेले होते. माघ महिन्याच्या एकादशीच्या दिवशी दोघेही खूप दुःखी होते, त्या दिवशी दोघांनी फक्त फळं खाल्ली. त्या रात्री खूप थंडी होती त्यामुळे दोघांनी रात्रभर जागरण केले. मात्र कडाक्याच्या थंडीने त्यांचा जीव घेतला आणि दोघेही मृत्यूमुखी पडले. नकळत मल्ल्यावान आणि पुष्यवती यांच्या हातून जया एकादशीचे व्रत केले गेले. दोघांनाही भगवान विष्णूने वरदान दिले आणि दोघांना पिशाच योनीतून मुक्ती मिळाली. व्रताच्या प्रभावामुळे मल्ल्यावान आणि पुष्यवती पूर्वीपेक्षा अधिक सुंदर होऊन स्वर्गात पोहोचले.

त्या दोघांना पाहून इंद्रदेव आश्चर्यचकित झाले. त्याने विचारले की तुम्हा दोघांची पिशाच्च योनीतून सुटका कशी झाली? त्यावर मल्यवानाने त्यांना जया एकादशीचे महत्त्व सांगितले. यामुळे त्याला पिशाच्च योनीतून मुक्ती मिळाली. हे ऐकून इंद्र प्रसन्न झाले आणि भगवान विष्णूचा आदेश मानून त्याने मल्यवान आणि पुष्यवती यांना स्वर्गात राहण्याची परवानगी दिली.

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

WhatsApp channel

विभाग