मराठी बातम्या  /  धर्म  /  Shravan 2023 : मुलांच्या दीर्घायुष्यासाठी केलं जाणारं जराजिवंतिका पूजन, वाचा त्याचं महत्व काय?

Shravan 2023 : मुलांच्या दीर्घायुष्यासाठी केलं जाणारं जराजिवंतिका पूजन, वाचा त्याचं महत्व काय?

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Aug 18, 2023 08:48 AM IST

Sawan 2023 : लहान बालकांच्या रक्षणासाठी जराजिवंतिका पूजन केलं जातं. मात्र त्यामागे नेमका काय अर्थ दडला आहे हे आपण पाहाणार आहोत.

जराजिवंतिका पूजन
जराजिवंतिका पूजन (HT)

जरे जिवन्तिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी।

रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते।।

असं म्हणत जरा-जिवंतिका पूजन आज केलं जाईल. आज श्रावण महिन्यातला पहिला शुक्रवार. चार देवतांची मिळून एक प्रतिमा आज विशेषत: बाळांच्या माता पूजतील. आपल्या बाळांना निरोगी,सदृढ आयुष्य लाभो यासाठी आज हे व्रत केलं जाईल. मात्र जरा-जिवंतिका पूजनाचं महत्व काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत.

काय आहे जरा-जिवंतिका पूजनाचं महत्व?

जिवतीला दिव्याच्या रुपात पाहिलं गेलं आहे. साधारणपणे फक्त जिवतीचं पूजन हे आषाढ अमावस्येच्या दिवशी केलं जातं.दिवा हा ज्ञानाचा, अंधकार मिटवून प्रकाश पसरवण्याचा प्रतीक म्हणून पाहिला गेला आहे. यालाच वंशवृद्धीचं प्रतीकही मानलं गेलं आहे. त्यामुळेच जिवतीचं पूजन केल्याने मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होतं असं म्हटलं गेलं आहे. जरा आणि जिवंतिका याचा एक अर्थ जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी, अर्थात म्हातारपणापर्यंत जिवंत ठेवणाऱ्या देवता म्हणून जरा-जिवंतिका पूजन केलं जातं.

जिवतीच्या प्रतिमेत चार देवतांना एकत्र का पूजलं जातं? देवांचा क्रम असण्याचा काय आहे अर्थ?

जिवतिची प्रतीमा चार देव एकत्र असणारी प्रतीमा आहे. यात सर्वात आधी नरसिंह, मग कृष्ण, त्यानंतर मुलांना खेळवण्याऱ्या जराजिवंतिका आणि सर्वात शेवटी बुध आणि गुरु यांचा समावेश आहे. आता या क्रमाचं महत्व काय आहे हेही आपण पाहाणार आहोत.

काय आहे देवतांच्या क्रमाचं महत्व?

भगवान विष्णूंचा चवथा अवतार असलेले नरसिंह, आपल्या बाल भक्तासाठी प्रगट झाले. ही कथा आपल्या सर्वांनाच ठावूक आहे. हिरण्यकश्यपूच्या रुपात असणाऱ्या दैत्यांपासून बालकांचं रक्षण करणे हा नरसिंहाचा उद्देश असल्याने प्रथम नरसिंहाची पूजा केली जाते. नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात. उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून होणारी हानी इत्यादी.

त्यानंतर येतात कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण. कृष्ण आणि त्याचे सवंगडी खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला. खेळणाऱ्या- बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. नाग हा सरटपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य. सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा, खेळत बागडत असताना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन रूपात पुजला जातो.

नंतर येतात त्या जरा व जिवंतिका. यांची एक कहाणीही प्रसिद्ध आहे. मगधनरेश राजा बृह्दरथ याला दोन राण्या असतात. दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते. परंतु राजाला मूलबाळ नसल्यामुळे राजा चिंतीत असतो. याच सुमारास नगरजवळील उपवनात ऋषी चंडकौशिक आल्याचे राजाला समजते. राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रगट करतो. ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात. दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो. कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा- अर्धा. अशा विचित्र आणि अर्धवट अभ्रकांना राजा जंगलात नेऊन टाकतो. त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते. ती दोन्ही अभ्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने दोनीही शकलं सांधते. जरा ते सांधलेले अभ्रक संध्यासमयास बृह्दरथ राजाला आणून देते. जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंघ ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रीत्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मन देतो. त्याच प्रमाणे जरादेवतेचा वार्षिक महोत्सव सुरु करतो, अशी ही जरा देवी. जारेंचीच सखी जिवंतिका. जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जिवती. जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवतो अशा रूपात दाखवतात.

प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध व बृहस्पती. बुध ह्तीवर बसलेला आणि हातात अंकुश असलेला पाहायला मिळतो. तर गुरु वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला पाहायला मिळतो. बुध हा ग्रहांचा राजकुमार आहे. बुध बालकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व हे गुण प्रदान करतात तर गुरु बालकाला शैक्षणिक प्रगती, अध्यात्मिक उन्नती, विवेकबुद्धी हे गुण प्रदान करतात. अशात बालकापासून मोठी व्यक्ती बनताना मनात उन्मत्तता आली तर ती अंकुश घालून बुधाने दूर करावी आणि अहंकार जागृत झाला तर तो गुरुंनी आपल्या चाबकाच्या फटक्यानं दूर करावा अशी इच्छा त्या बालकांच्या माता व्यक्त करतात. आपलं मूल हे सर्वगुण संपन्न होत असताना त्याला गर्वाची बाधा होऊ नये यासाठी बुध आणि गुरुंना पूजलं जातं.

या चार देवतांना अशा क्रमाने पूजलं जातं. म्हणजे प्रथम बालकांचं रक्षण करणारी देवता, दुसरी जन्मलेल्या बालकांचं रक्षण आणि त्यांना दीर्घायुष्य देणारी देवता, बालकांच्या रुपात भर घालणाऱ्या जराजिवंतिका आणि त्यानंतर बालकांना प्रौढ़ावस्थेत जाताना अहंकार किंवा उन्मत्ता येऊ नये म्हणून पूजले जाणारे बुध आणि गुरु.

एका आईशिवाय आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे कोण ओळखू शकतं. त्यामुळेच आपल्या मुलाने प्रौढ़ावस्थेपर्यंत नम्र राहावे, त्यावर कोणतेही संकट येऊ नये यासाठी माता हे पूजन श्रावणाच्या शुक्रवारी करतात. या दिवशी जराजिवंतिका पूजन करून दिवसभर उपवास करतात.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग