पवनपुत्र भगवान हनुमानाची जयंती दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला आणि कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरी केली जाते. चैत्र महिन्यात आज मंगळवार २३ एप्रिल २०२४ रोजी हनुमान जन्मोत्सव साजरा केला जात आहे.
हनुमान जयंतीचा दिवस राम भक्त आणि हनुमान भक्त दोघांसाठी खूप खास आहे. देशभरात लोक हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतात. पण काही लोक याला हनुमान जयंती म्हणतात तर काहीजण हनुमान जन्मोत्सव असेही म्हणतात. या दोघांमध्ये काय फरक आहे आणि काय म्हणणे योग्य आहे? याबाबत लोकांमध्ये संभ्रम कायम आहे. त्याबद्दल जाणून घ्या.
हनुमानाच्या जन्मदिवसाला जयंती न म्हणता जन्मोत्सव म्हणणे योग्य ठरेल, असे तज्ञांचे मत आहे. कारण जयंती आणि जन्मोत्सव म्हणजे वाढदिवस असू शकतो. परंतु जयंती अशा व्यक्तीसाठी वापरली जाते जे हयात नाही. परंतु जेव्हा भगवान हनुमानाचा विचार केला जातो तेव्हा ते कलियुगातील जिवंत किंवा जागृत देवता मानले जातात. यामागे एक पौराणिक कथाही सांगितली जाते.
हनुमान सफरचंद समजून सूर्याला गिळंकृत करण्यासाठी झेपावला होता, तेव्हा सर्व देवतांनी इंद्रदेवाकडे धाव घेतली, इंद्रदेवाच्या वज्राचा प्रहार हनुमानावर झाला. मुर्छीत हनुमान जमीनीवर पडला. त्याच्या जबड्यावर प्रहार झाला. हे पाहून वायूदेव संतापले आणि त्यांनी पृथ्वीवरून आपलं अस्तीत्व संपवण्याचा निर्णय घेतला. आता हवे अभावी पशू पक्षी मरण पावतील या भीतीने देवांनी वायूदेवाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
वायूदेवाचा क्रोध शांत व्हावा यासाठी स्वतः ब्रह्मा-विष्णू-महेश प्रकट झाले आणि ब्रह्माचे ब्रह्मास्त्र, श्री विष्णूचे सूदर्शनचक्र आणि शंकराचं त्रिशुळ अशा कोणत्याही अस्त्राचा मारुतीवर परिणाम होणार नाही असं स्पष्ट केलं. त्यानंतर मारुतीला इंद्राने विलक्षण जबडा असलेला म्हणजेच हनुमान असं नाव दिलं. रामायणात हनुमानाच्या भक्तीने प्रसन्न झाल्याने खुद्द श्रीरामांनी हनुमानाला चिरंजीवी भव असा वर दिल्याचा उल्लेख आहे.
खुद्द श्रीरामांनी हनुमानाला चिरंजीवी म्हणजेच अमरत्वाचं वरदान दिलं आहे. तज्ज्ञांच्या मते जयंती त्याची साजरी करतात, ज्याचं निधन झालं आहे. हनुमान हा चिरंजीव असल्याने त्याची जयंती साजरी करणं योग्य नाही असं अभ्यासकांचं मत आहे. त्यामुळेच हनुमान जयंती नव्हे तर हनुमान जन्मोत्सव असं म्हणावं असं अभ्यासकांचं म्हणणं आहे.
तसंच कार्तिक मासातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला मारुतीरायांचा जन्म झाला होता, असा संदर्भ विविध पुस्तकांमध्ये आढळतो. धार्मिक कथांनुसार, या दिवशी अंजनी मातेच्या पोटी मारुतीरायांनी जन्म घेतला होता. म्हणूनच ही तिथीसुद्धा हनुमान जन्मोत्सव म्हणून धुमधडाक्यात साजरी केली जाते.