पाच जिल्हे आणि तब्बल साडेसातशे किलोमीटरचा टप्पा पार करून तब्बल एक महीन्यांची मजल दरमजल करत पंढरीच्या विठूरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शेगावचे संत गजानन महाराजांच्या पालखीनं आज प्रस्थान ठेवलं.
टाळ मृदुंगांच्या जयघोषात, हजारो भाविकांच्या साक्षीनं शेगाव नगरी फुलून गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सातशे वारकऱ्यांसह आज संत गजानन महाराजांच्या पालखीनं पंढरपूरच्या दिशेनं आपलं पहिलं पाऊल ठेवलं. आता पुढचा एक महिना पंढरीच्या दिशेने पालखी प्रवास करेल.
कपाळी अबीर आणि चंदनाचा टिळा, हाती वैष्णव धर्माची पताका, टाळ आणि मृदुंग घेतलेले वारकरी, डोक्यावर तुळशी वृंदावन, पांढरी टोपी आणि सदरे आणि मुखी विठ्ठलाचं आणि ‘गण गण गणात बोते’ चा गजर असं एकंदरीत वातावरण आज शेगाव इथं पाहायला मिळालं. एखादा उत्सवच पार पडत आहे असंही चित्र इथं पाहायला मिळालं.
शेगाव इथनं प्रस्थान ठेवणाऱ्या संत गजानन महाराज पालखी मार्गावरील वाहतुकीतही बदल करण्यात आला आहे. पालखी मार्गावर होणारी भाविकांची अलोट गर्दी लक्षात घेता चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. आयत्यावेळेस गर्दीने खोळंबा झाल्यास पालखी बाबत योग्य निर्णय घेण्याचा अधिकार पालखी प्रमुखांना राहाणार आहे.
दरवर्षी महाराष्ट्रातून ४३ पालख्या पंढरपुरात आषाढी वारीसाठी दाखल होतात. या पालख्यांमध्ये माऊलींची पालखी, तुकोबारायांची पालखी, सोपानकाकांची पालखी या मुक्ताईंची पालखी, गजानन महाराजांची पालखी या पालख्या आकर्षणाचं केंद्र ठरतात.
माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी आळंदीत अनेक दिंड्यातून दाखल होतात. १२ जूनला श्रींची पालखी गांधी वाड्यात दाखल होणार आहे. त्यानंतर पालखी मार्गस्थ होईल.
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी यावर्षी देहूतून १० जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार असून २८ जून रोजी संत तुकोबारायांची पालखी पंढरीत दाखल होणार आहे. यंदा पालखी सोहळ्याचे ३३८ वे वर्ष आहे.