छोट्या पडद्यावरील सगळ्याच मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. अशातच आता ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका देखील सध्या चर्चेत आली आहे. चार वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी ही मालिका आता एका वेगळ्या वळणावर पोहोचणार आहे. या मालिकेत आता सात वर्षांचा लीप येणार असून, अप्पी आणि अर्जुन दोघेही वेगवेगळ्या वाटेवर प्रवास करताना दिसणार आहेत. यामुळे मालिकेत एक नवा ट्वीस्ट देखील येणार आहे. याशिवाय एक चिमुकला कलाकार या मालिकेत एन्ट्री घेणार आहे.
अर्जुनच्या आईच्या मृत्यूबाबतचं सत्य लपवल्यामुळे अप्पीवर चिडलेल्या अर्जुनने तिच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. तर, कलेक्टर अप्पीची बदली उत्तराखंडमध्ये झाली. यामुळे दोघेही आता वेगवेगळ्या वाटा निवडून आपापल्या करिअरमध्ये पुढे जाताना दिसले. मात्र, अप्पी उत्तराखंडला जाताना आणि अर्जुनची साथ सोडताना सोबत आपल्या मुलाला म्हणजेच अमोलला घेऊन निघाली होती. इकडे अर्जुन आपल्या करिअरमध्ये पुढचा टप्पा गाठत होता. तर, तिकडे उत्तराखंडमध्ये बदली होऊन गेलेली कलेक्टर अप्पी आपल्या मुलाच्या संगोपनाबरोबरच आपलं करिअर देखील यशस्वीपणे सांभाळत होती.
आता दोघेही एकमेकांपासून दूर होऊन सात वर्षे झाली आहेत. सात वर्षानंतर आता त्यांचा मुलगा देखील मोठा झालाय. नुकतीच सोशल मीडियावर अप्पी आणि अर्जुन यांच्या मुलाची म्हणजेच अमोलची झलक पाहायला मिळाली. सोशल मीडियावर ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ या गाण्यातून घराघरात पोहोचलेला चिमुकला साईराज केंद्रे हा ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत ‘अमोल’ची भूमिका साकारताना दिसणार आहे.
नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. या प्रोमोमध्ये साईराजची झलक पाहायला मिळाली आहे. आता सात वर्षानंतर अप्पी आणि अर्जुन एकमेकांसमोर येणार असून, मालिकेचं कथानक रंजक वळणावर पोहोचलं आहे. अप्पी गाव सोडून उत्तराखंडला जात असताना अर्जुनने तिच्याकडून वचन घेतलं होतं की, ती आयुष्यात कधीही अमोलला त्याच्या वडिलांबद्दल काहीही सांगणार नाही.