Uttar Pradesh Crime News : सध्याच्या काळात अनेक लोक ऑफिसमध्ये काम करत असताना, व्यायाम करत असताना किंवा जेवण करतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर करत असतात. तर काही लोकांना महागड्या गाड्यांच्या टपावर बसून व्हिडिओ शूट करायला आवडतं. परंतु महामार्गावर थांबून कारसमोर व्हिडिओ शूट करणं एका सोशल मीडिया स्टार तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे.
रिल्स तयार करताना तरुणीनं वाहतुकीचा नियम मोडल्यामुळं पोलिसांनी तिला तब्बल १७ हजार रुपयांचा दंड ठोठावल्याची घटना समोर आली आहे. तरुणीनं उत्तर प्रदेशातील गाझीयाबादजवळील महामार्गावर व्हिडिओ शूट केला होता. त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तिच्याविरोधात कारवाई करत मोठं पाऊल उचललं आहे.
उत्तर प्रदेशातील गाझीयाबादच्या एलिवेटेड रोडवर वैशाली चौधरी नावाच्या तरुणीनं महामार्गावर कार थांबवून रिल्स तयार केली. त्यावेळी महामार्गावरून अनेक वाहनं वेगानं जात होती. त्यावेळी वैशालीनं डान्स करत युजर्सला फ्लाइंग किसही दिला. वैशालीनं हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर तो चांगलाच व्हायरल झाला. परंतु प्रकरण जेव्हा पोलिसांपर्यंत पोहचलं तेव्हा पोलिसांनी वैशाली चौधरीवर वाहतुकीचा नियम मोडल्याप्रकरणी तब्बल १७ हजार रुपयांचा फाईन लावला आहे. त्यानंतर आता पुढील कार्यवाही केली जात असल्याचं गाझीयाबादच्या वाहतूक पोलिसांनी सांगितलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते शिर्डी या समृद्धी महामार्गाचं उद्घाटन झालं होतं. त्यानंतर काही दिवसांतच एका तरुणानं समृद्धी महामार्गावर वाहनासमोर रायफलीनं गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. त्यामुळं आता सोशल मीडियावर रिल्स आणि व्हिडिओ शूट करणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी करडी नजर ठेवायला सुरुवात केली आहे.
संबंधित बातम्या