मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Gang Rape : मित्रासोबत फिरायला गेलेल्या इंजिनियर तरुणीवर सामूहिक बलात्कार; फरार आरोपींचा तपास सुरू

Gang Rape : मित्रासोबत फिरायला गेलेल्या इंजिनियर तरुणीवर सामूहिक बलात्कार; फरार आरोपींचा तपास सुरू

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 22, 2022 02:40 PM IST

Gang Rape Case In Jharkhand : पीडित तरुणी एका कंपनीत सॉफ्टवेयर इंजिनियर म्हणून काम करते. सध्या वर्क फ्रॉम होम असल्यामुळं ती भावाच्या मित्रासोबत विमानतळावर फिरायला गेला होती. त्यावेळी ही संतापजनक घटना घडली आहे.

Gang Rape Case In Jharkhand
Gang Rape Case In Jharkhand (HT_PRINT)

Gang Rape Case In Jharkhand : गेल्या काही महिन्यांत दोन बलात्काराची प्रकरणं समोर आल्यानंतर आता झारखंडमध्ये आणखी एका तरुणीवर १० जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळं खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून नराधमांचा शोध घेतला जात आहे. पीडित तरुणी मित्रासोबत विमानतळावर फिरायला गेली होती त्यावेळी ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका कंपनीत सॉफ्टवेयर इंजिनियर म्हणून काम करणारी तरुणी भावाच्या मित्रासोबत चाईबासा विमानतळावर फिरायला गेली होती. त्यावेळी १० आरोपींनी दोघांना घेरुन तरुणीसोबत असलेल्या तिच्या मित्राला मारहाण करत तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. याशिवाय त्यांच्याकडील रोख रक्कम, एटीएम कार्ड आणि महागड्या वस्तू घेऊन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. ही घटना झाल्याचं समजताच स्थानिक लोकांनी तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. पीडित तरुणीची प्रकृती चिंताजनक असून पोलिसांनी या प्रकरणात १० अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तरुणीसह तिच्या मित्राला मारहाण करत त्यांच्याकडील पैसे लुटले आहेत. याशिवाय दहा जणांनी सॉफ्टवेयर इंजिनियर असलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार केला असून त्यांना अटक करण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये झारखंडमध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वीच एका तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याशिवाय एकतर्फी प्रेमप्रकरणातून एका हल्लेखोरानं तरुणीवर अॅसिड फेकलं होतं. त्यानंतर आता सॉफ्टवेयर इंजिनियर असलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याच्या घटनेनंतर झारखंडमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

IPL_Entry_Point

विभाग