मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  भारतात कोरोनाच्या मिनी लाटेची शक्यता, WHO ने दिला इशारा

भारतात कोरोनाच्या मिनी लाटेची शक्यता, WHO ने दिला इशारा

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jun 10, 2022 12:06 PM IST

देशात सलग दोन दिवस कोरोनाचे ७ हजारांहून जास्त रुग्ण आढळले आहेत.

सौम्या स्वामीनाथन
सौम्या स्वामीनाथन (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

WHO on Covid 19 : जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉक्टर सौम्या स्वामीनाथन (Soumya Swaminathan) यांनी भारतातील अनेक भागात ओमिक्रॉनचा सब व्हेरिअंट वेगाने पसरत असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी असंही म्हटलं की, "ही मिनी कोरोना लाटेची सुरुवात असू शकतो."महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. सलग दोन दिवस देशात कोरोनाचे ७ हजारांहून जास्त रुग्ण आढळले आहेत.

सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या की, "आता जो सब व्हेरिअंट दिसत आहे तो मूळ ओमिक्रॉनच्या तुलनेत वेगाने पसरत आहे आणि हा प्रतिकार शक्ती वेगाने कमी करण्याची शक्यता आहे. ४ ते ६ महिन्यांच्या अंतराने कोरोनाची मिनी लाट येऊ शकते. सध्या जे रुग्ण आढळत आहेत ते असेच आहेत. या व्हेरिअंटला आटोक्यात आणण्यासाठी कोरोनाच्या सर्व प्रोटोकॉलचे पालन करण्याची गरज आहे. सोबतच व्हेरिअंट ट्रॅक करणे गरजेचे असल्याचंही सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले.

आता कोरोनाची चाचणी घरीच करता येते. अशा परिस्थिती रुग्णसंख्या कमी आढळत आहे. रुग्णालयात दाखल असलेल्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. तसंच जास्त जोखीम असलेल्या लोकांना बूस्टर डोस द्यायला हवेत. बीए ४ आणि बीए ५ व्हेरिअंटमुळे दक्षिण आफ्रिकेत पाचवी लाट आली. अंदाजापेक्षा ही लाट कमी तीव्र होती अशी माहितीसुद्धा सौम्या स्वामीनाथन यांनी दिली.

अडीच वर्षाहून अधिक काळ जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना कुठून आला याचा शोध मात्र अद्याप लागलेला नाही असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. कोरोना लॅबमधून लीक होऊन मानवामध्ये पसरल्याची शक्यता खूपच कमी असल्याचं गेल्या वर्षी जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं होतं. आता याच्या शोधासाठी अभ्यासाची गरज असून कोरोना व्हायरस लॅबमधून मानवामध्ये पसरल्याच्या शक्यतेचं सविस्तर विश्लेषणही समाविष्ट कऱण्यात आलं आहे.

देशात सलग दुसऱ्या दिवशी ७ हजारांंहून जास्त कोरोना बाधितांची नोंद झाली. गेल्या २४ तासात देशात ७ हजार ५८४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ३ हजार ७९१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर २४ जणांचा मृत्यू झाला आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग