मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Options Trading: खर्च भागवण्यासाठी ट्युशन क्लास घेणारी तरुणी स्टॉक मार्केटमधून करतेय लाखोंची कमाई

Options Trading: खर्च भागवण्यासाठी ट्युशन क्लास घेणारी तरुणी स्टॉक मार्केटमधून करतेय लाखोंची कमाई

HT Marathi Desk HT Marathi
Sep 11, 2022 07:00 PM IST

कविता या सध्या एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत काम करतात. त्याशिवाय शेअर मार्केटमध्ये त्या ऑप्शन्स ट्रेडिंगही करतात. त्यातून त्या लाखोंची कमाई करतात. जाणून घ्या त्यांच्या यशाचं मंत्र.

Kavita, Options trader and an IT professional
Kavita, Options trader and an IT professional

अकरा वर्षांपूर्वी एका खासगी कंपनीत काम करत असताना कविताच्या मनात शेअर बाजारातील उलाढाल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. त्यावेळी खासगी कंपनीत तिचा महिन्याचा पगार ३० हजार रुपये होता. आज कविताच्या पोर्टफोलिओची किंमत तब्बल २ कोटी रुपयांहून अधिक आहे.

पैसे कमवण्यासाठी शेअर बाजार म्हणजे जगातील सर्वात कठीण आणि जोखीम असलेले ठिकाण मानलं जातं. खासकरून फ्युचर्स आणि ऑप्शन्स ट्रेडिंगबाबत हे सर्रास बोललं जातं. परंतु यातील नेमकं गमक जाणून घेऊन ट्रेंडिंग करून पैसे कमवणारे बरेच जण आपल्या आजूबाजूला दिसतात. कविता ही मूळची पश्चिम बंगालमधील बर्दवान जिल्ह्याची रहिवासी आहे. सध्या ती एका ऑस्ट्रेलियन कंपनीत IT Professional म्हणून पूर्णवेळ काम करते. ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये तिचा हातखंडा असून त्याद्वारे भरपूर आर्थिक लाभ झाला आहे.

आर्थिक बचतीची कला

‘आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात पालकांचा पाठिंबा असणे फार आवश्यक असते. तो तुमच्या यशाचा निर्णायक घटक असतो’ असं कविताचं म्हणण आहे. वायफळ खर्च करण्याच्या सवयीवर झाकण ठेवल्यास कुणीही आरामात पैशांची बचत करू शकतो, अशी शिकवण पालकांकडून मिळाल्याचं कविताने सांगितलं. लहानपणापासून वर्गात टॉपर असूनदेखील वसतिगृहाची फी देणे वडिलांना परवडत नसल्याने कविताने गावाजवळचे कॉलेज निवडले होते. कॉलेजमध्ये शिकत असताना गावातील मुलांचे ट्यूशन क्लासेस घ्यायला सुरूवात केली. कॉलेजमधून संध्याकाळी घरी परतल्यावर रात्री नऊ वाजेपर्यंत शिकवणी वर्ग घेत असे.

कॉलेज पूर्ण झाल्यानंतर पुण्यात एका आयटी कंपनीत नोकरीला लागल्यानंतर कंपनीच्या एका ट्रेनिंगदरम्यान कार्यालयातला एक सहकारी शेअर्स खरेदी-विक्रीमध्ये डुंबलेला तिने पाहिला. शेअर मार्केटची ओळख होण्याची कविताची ही पहिलीच वेळ. कविताला स्वतःसाठी अतिरिक्त कमाई करण्याची आधीपासून सवय होती. तिने स्टॉक ट्रेडिंगबद्दल अधिक जाणून घेण्याचे ठरवले. या सहकाऱ्याने तिची स्टॉक ट्रेडिंगशी ओळख करून दिली. शिवाय दैनिके आणि मासिकांमधूनही याविषयाचे ज्ञान तिने मिळवले.

कविताने इंट्राडे ट्रेडिंग सुरू केल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात दररोज २०० ते ४०० रुपये नफा बुक केला. पण तिच्यासाठी ट्रेडिंग हे ऑन-ऑफ प्रकरण होतं. पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी ३ लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतल्यानंतर कविताने शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत मोठी झेप घेतली. एका सहकाऱ्याने IPO साठी अर्ज केल्याचे पाहून कविताने कर्ज घेतले आणि लिस्टिंगवर मोठा परतावा मिळवला. कविताचा हा निर्णय एक टर्निंग पॉईंट ठरला. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याबाबतचा तिचा उत्साह द्विगुणित झाला. हळूहळू तिने तिच्या पोर्टफोलिओचा आकार २० लाख रुपयांपर्यंत वाढवला.

२०१६ साली एका ब्रोकरेजतर्फे फ्युचर्स अँड ऑप्शन्स या विषयावर आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात ट्रेडिंगच्या इतर पैलूंची औपचारिक माहिती मिळाल्याचे कविता सांगते. कविताने नंतर फ्युचर्समध्ये व्यापार करण्यास सुरुवात केली. परंतु यात तिने बऱ्यापैकी पैसे गमावले सुद्धा. म्युच्युअल फंड आणि मोठ्या गुंतवणूकदारांनी तोटा भरून काढण्यासाठी काय केले याबद्दलही तिनं वाचन सुरू ठेवलं. यादरम्यान कव्हर कॉल ऑप्शन्स स्ट्रॅटेजीविषयी तिने सखोल माहिती मिळवली. अशाप्रकारे ऑप्शन स्ट्रॅटेजीजवर प्रभुत्व मिळवून गुंतवलेल्या भांडवलावर तिला चांगले रिटर्न्स मिळू लागले. कविता सध्या साप्ताहिक आणि मासिक पर्याय समोर ठेवून ट्रेडिंग करत असते. एखाद्याने केवळ शेअर बाजारातील ट्रेडिंगमधून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या स्रोतावरच पूर्णपणे विसंबून राहू नये, असं कविताचं म्हणण आहे. उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत असणे आवश्यक असल्याचं तिचं म्हणण आहे.

जोपर्यंत स्टॉक मार्केटबद्दल तुम्हाला पुरेसे ज्ञान, निधी आणि गुंतवणुकीबाबतचा आत्मविश्वास येत नाही तोपर्यंत शेअर बाजार हा विषय बाजुला ठेवलेला बरा, असा सल्ला शेअर बाजारात नव्याने गुंतवणूक करणाऱ्यांना देते. कविताचे शेअर बाजारात आतापर्यंतचे सर्वात मोठे ८ लाख रुपयांचे नुकसान झाले होते. तथापि, चुकांमधून धडा घेऊन आणि अनुभवांतून ती आता दरवर्षी ऑप्शन ट्रेडिंगद्वारे चांगला परतावा मिळवत असते. ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये कविताला आजपर्यंत सर्वात मोठा म्हणजे १४ लाख रुपयांचा फायदा झालेला आहे. ती आता स्टॉक मार्केटची 'गुरु' असल्याने थोड्या रकमेपासून सुरुवात करा असा सल्ला देते. एखाद्याकडे १० लाख रुपयांचे भांडवल असेल तर सुरुवात ५० हजार ते १ लाख रुपयांपासून करावी. सर्वच्या सर्व पैसे कधीही बाजारात गुंतवू नयेत असा ती सल्ला देते.

'कष्ट', 'सातत्य' आणि 'शिस्त' हेच आपल्या यशाचं मंत्र असल्याचं कविता सांगते. यश मिळवून समाजाला परत देण्याचे तिचे अंतिम ध्येय आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या