मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Sharad Pawar : ‘गुजरात दंगलीतील आरोपींना सोडणं ही संविधानाची हत्या’, शरद पवारांचा थेट मोदी-शहांवर आरोप

Sharad Pawar : ‘गुजरात दंगलीतील आरोपींना सोडणं ही संविधानाची हत्या’, शरद पवारांचा थेट मोदी-शहांवर आरोप

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 21, 2023 07:38 PM IST

Sharad Pawar : कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळं देशाच्या संविधानाची हत्या झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

Sharad Pawar On Modi Shah
Sharad Pawar On Modi Shah (HT_PRINT)

Sharad Pawar On Modi Shah : नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना २००२ साली गोध्रा जळीतकांडानंतर उसळलेल्या दंगलीत निष्पाप लोकांची हत्या करणाऱ्या ६८ आरोपींची अहमदाबादेतील स्पेशल कोर्टाने सुटका केली आहे. गुजरातमधील नरोदा पाटिया आणि गोध्रा येथील दंगलीतील आरोपींची सुटका करण्यात आल्यामुळं विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करत भूमिका स्पष्ट केली आहे. गुजरात दंगलीत लोकांची हत्या झालीच, परंतु कालच्या निर्णयामुळं देशातील संविधानाची हत्या झाल्याचा आरोप शरद पवार यांनी मोदी सरकारवर केला आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात बोलताना खासदार शरद पवार म्हणाले की, काही वर्षांपूर्वी गुजरातमध्ये अल्पसंख्यांकांच्या हत्या झाल्या होत्या. त्यात अनेक लोक मृत्युमुखी पडले. गुजरातमधील दंगलीमागे तेथील सत्ताधारी पक्ष होता. या प्रकरणात अनेक लोकांना अटक झाली, अनेक दिवस यावर कोर्टात सुनावणी झाली. परंतु आता गुजरात दंगलीच्या आरोपाखाली ज्या लोकांना अटक करण्यात आली होती, त्यांची सुटका करण्यात आली आहे. हायकोर्टाचा निर्णय आल्यानंतर अनेकांची सुटका करण्यात आली. त्यामुळं लोकांचीच नाही तर देशातील संविधानाचीही हत्या करण्यात आली आहे, असं म्हणत शरद पवारांनी मोदी सरकारवर टिकास्त्र सोडलं आहे.

Kharghar Incident : खारघर येथील घटनेची न्यायालयीन चौकशी करा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची मागणी

गुजरात दंगलीत ज्या लोकांच्या हत्या झाल्या, त्या कशा झाल्या?, कुणी हल्ला अथवा दंगलच केली नाही तर लोकांना कुणी मारलं?, त्यामुळं गुजरातच्या दंगलीत लोकांच्या हत्या झाल्या आणि त्यानंतर आता या प्रकरणातील आरोपींची सुटका झाल्यामुळं देशातील संविधानाची हत्या झाली आहे. कोर्टाच्या निर्णयामुळं देशातील कायद्याची हत्या झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे, असं म्हणत शरद पवारांनी अहमदाबाद स्पेशल कोर्टाच्या निर्णयावर टीका केली आहे.

IPL_Entry_Point