मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kharghar Incident : खारघर येथील घटनेची न्यायालयीन चौकशी करा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची मागणी

Kharghar Incident : खारघर येथील घटनेची न्यायालयीन चौकशी करा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची मागणी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 21, 2023 07:37 PM IST

Kharghar Incident : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने १५ लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

Sharad Pawar On Kharghar Incident
Sharad Pawar On Kharghar Incident (Chandrakant Paddhane)

Sharad Pawar On Kharghar Incident : महाराष्ट्र शासनामार्फत देणाऱ्या येणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळं १५ लोकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यामुळं राज्यात राजकीय वाद पेटला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एकसदस्यीय समिती नेमल्यावरून विरोधकांनी चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खारघरमधील दुर्घटनेची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे. राज्यात एखादी दुर्घटना घडली असेल तर त्याची चौकशी करणं ही राज्यातील सरकारची जबाबदारी असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी केलं आहे. राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण सोहळ्यात योग्य खबरदारी न घेतल्यामुळं मोठी दुर्घटना घडली. कार्यक्रमात मोठी गर्दी करून आगामी निवडणुकीच्या संदर्भात स्वतःच्या राजकारणाला अनुकूल वातावरण तयार करायचा हेतू सत्ताधाऱ्यांचा होता, परंतु त्याची निष्पापांना किंमत मोजावी लागली, असं म्हणत शरद पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केलं आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जेष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत मुंबईतील खारघर येथील कार्यक्रमात धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. परंतु या कार्यक्रमाची वेळ भरदुपारी असल्यामुळं कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांना प्रखर उन्हात अनेक तास बसून रहावं लागलं होतं. परिणामी उष्माघातामुळं १५ लोकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. त्यामुळं महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात १५ श्रीसदस्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या आरोपींवर कारवाई करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती.

Maratha Reservation : मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारचं पुढचं पाऊल; अखेरचा पर्याय वापरणार

खारघर येथील दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी दोनदिवसीय अधिवेशन बोलावण्याची मागणी विरोधकांनी केली होती. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने एकसदस्यीय समिती नेमत या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा केली होती. परंतु आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खारघर येथील दुर्घटनेची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळं आता राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारची राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point