मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Akash Ambani: भारतीय उद्योगविश्वाचा भावी चेहरा कोण? 'टाइम'च्या यादीत 'हे' एकच नाव

Akash Ambani: भारतीय उद्योगविश्वाचा भावी चेहरा कोण? 'टाइम'च्या यादीत 'हे' एकच नाव

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Sep 29, 2022 08:02 PM IST

Akash Ambani: टाइम मासिकानं प्रसिद्ध केलेल्या १०० उद्योन्मुख उद्योगपतींच्या यादीत भारतातून फक्त एका तरुणाला स्थान मिळालं आहे.

Akash Ambani
Akash Ambani

भविष्यात उद्योगविश्वात चमकू शकणाऱ्या जगभरातील १०० उद्योजकांची (Time 100 Next List) यादी टाइम मासिकानं जाहीर केली आहे. प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या यादीत भारतातील फक्त आकाश अंबानी (Akash Ambani) यांच्या नावाचा समावेश झाला आहे. आकाश अंबानी हे भारतीय उद्योगाचा वारसा समर्थपणे पेलू शकतील, असं मत ‘टाइम’नं व्यक्त केलं आहे.

वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी आकाश अंबानी यांना रिलायन्स जिओ इन्फोकाॅमच्या संचालक मंडळात स्थान मिळालं होतं. तिशीत पदार्पण केलेल्या आकाश यांनी नुकतीच ४२६ दशलक्ष सबस्क्राइबर्स असलेल्या देशातील सर्वात मोठी टेलिकाॅम कंपनी रिलायन्स जिओच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतली आहे. उद्योगव्यवसायाचे बाळकडू कुटुंबातच मिळालेले आकाश अंबानी हे व्यवसायवृद्धीसाठी कायम प्रयत्नशील असतात. जिओच्या संचालक मंडळात सहभागी झाल्यापासून त्यांच्या कामाचा धडाका सुरू आहे. गुगल आणि फेसबूकडून अब्जावधी डाॅलर्सची गुंतवणूक मिळवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रिलायन्स जिओ कंपनीची धुरा योग्यरित्या हाताळल्यास आकाश अंबानी यांना रिलायन्स उद्योग समूहात लवकरच मोठी जबाबदारी मिळू शकते, अशी शक्यताही 'टाइम'नं वर्तवली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ऑगस्टमध्ये झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जिओच्या वतीनं अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची घोषणा केली आहे. इंटरनेट युजर्सना घरी किंवा कामाच्या ठिकाणी वेगवान इंटरनेट कनेक्टिविटी देऊ शकणारी जिओ फायबर ही वायफाय हाॅटस्पाॅट यंत्रणा सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. भारतातील पाच प्रमुख शहरात यंदाच्या दिवाळीपर्यंत स्वतंत्ररित्या ५ जी सेवा सुरू करण्याची तयारी जिओनं सुरू केली आहे. ही योजना पूर्णत्वाला नेताना आकाश अंबानी यांचा कस लागणार आहे. तसंच, पुढील वर्षीच्या डिसेंबर अखेरपर्यंत देशातील सर्व तालुके, छोटी शहरे व गावांमध्येही ५ जी सेवा देण्याची कंपनीची योजना आहे.

टाइम मासिकाच्या उदयोन्मुख उद्योगपतींच्या यादीत स्पॅनिश टेनिसपटू कार्लोज अल्कराज, अमेरिकन गायक एसझा, 'वन्स अपॉन अ टाइम इन हाॅलीवूड'फेम अभिनेत्री सिडनी स्वीनी, बास्केटबाॅलपटू जा मोरांट आणि टीव्ही स्टार केके पाल्मरचा समावेश आहे. याशिवाय, पर्यावरणवादी कार्यकर्त्या फरविझा फरहान आणि भारतीय वंशाच्या अमेरिकन व्यावसायिका आम्रपाली गान यांनाही यादीत स्थान मिळालं आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग