मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Karnataka Assembly poll : कर्नाटकमध्ये ‘गुजरात मॉडेल’ भाजपचे काम करणार तमाम, आठवड्यात ८ जणांचा पक्षाला रामराम

Karnataka Assembly poll : कर्नाटकमध्ये ‘गुजरात मॉडेल’ भाजपचे काम करणार तमाम, आठवड्यात ८ जणांचा पक्षाला रामराम

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 17, 2023 04:24 PM IST

Karnataka assembly poll 2023 : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून अनेक वरिष्ठ नेते भाजपची साथ सोडून काँग्रेसचा हात पकडत आहेत. यामुळे भाजपचे गुजरात मॉडेल कर्नाटकात जड जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Karnataka poll 2023
Karnataka poll 2023

Karnataka Assembly Poll 2023 : कर्नाटकमध्ये १० मे रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. यापूर्वीच राज्यात भाजपच्या अचडणीत वाढ होताना दिसत आहे. सत्ताधारी भाजपने तिकीट कापल्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि माजी उप मुख्यमंत्र्यांपासून विद्यमान आमदार व माजी आमदार पक्षाला रामराम ठोकत आहेत. त्यापैकी अनेकांनी प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसचा हात पकडला आहे. आठवड्यातआठहून अधिक मोठ्या नेत्यांनी भाजपची साथ सोडली आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टरपासून माजी उप मुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांचा समावेश आहे. हे दोन्ही नेते काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत.

या नेत्यांनी सोडली भाजपची साथ -

भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यापासूनअनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. जगदीश शेट्टर यांनी आज (१७ एप्रिल) काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तर माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनीही दोन दिवसात काँग्रेसचा हात पकडला होता.

बेळगाव जिल्ह्यातील अथणी मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेले सावदी यांचा२०१८च्या निवडणुकीत महेश कुमथल्ली यांनी पराभव केला होता. तेव्हा कुमथल्ली हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते. आता भाजपने कुमथल्ली यांना तिकीट दिले आहे. तर दुसरीकडे सावदी हे त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या तिकिटावरनिवडणूक लढवणार आहेत.याबरोबरच, नेहरू ओलेकर, एमपी कुमारस्वामी, एमएलसी आर शंकर आणि गुलीहट्टी डी शेखर यांनी भाजपची साथ सोडली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते केएस ईश्वरप्पा यांनी, राजकारणातून निवृत्ती घेत आगामी निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. ईश्वरप्पा यांनी राज्य सरकारमध्ये अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे.

काय आहे भाजपचे 'गुजरात मॉडेल'?
भाजप सामान्यपणे प्रत्येक निवडणुकीत जवळपास ३० टक्के विद्यमान आमदार व मंत्र्यांचे तिकीट कापून नवीन चेहरे व तरुणांना संधी देते. यापूर्वी हा प्रयोग गुजरातमध्ये झाला होता. मात्र नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी पक्षाचे केंद्रीय नेतृत्व स्वीकारल्यापासून अन्य राज्यातही हा प्रयोग केला जात आहे.

भाजपच्या या रणनितीमुळे पक्षाचे काही वरिष्ठ नेते पक्ष सोडून जात आहेत. मात्र तरुण चेहऱ्यांना मैदानात उतरवण्याची संधी भाजपला मिळत आहे. मात्र कर्नाटकमध्ये गुजरातचे मॉडेल किती परिणामकारक ठरणार याचा निर्णय १३ मे रोजी जाहीर होणाऱ्या निकालानंतरच समजेल. मात्र त्यापूर्वीच गुजरातच्या अमूल डेअरी ब्रांडवरूनही राज्यात राजकीय वातावरण गरम झाले आहे.

 

IPL_Entry_Point

विभाग