मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Karnataka Election : कर्नाटकी प्रचाराचा ‘धुरळा’ शांत.. शेवटच्या दिवशी मोदींचे भावनिक आवाहन तर प्रियंका गांधींचा पलटवार

Karnataka Election : कर्नाटकी प्रचाराचा ‘धुरळा’ शांत.. शेवटच्या दिवशी मोदींचे भावनिक आवाहन तर प्रियंका गांधींचा पलटवार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 08, 2023 06:16 PM IST

Karnatakaassemblyelectioncampaign : १० मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासूनकाँग्रेस व भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांची राळ उठलेली आहे. आज सायंकाळी सहा वाजता प्रचार संपला.

 Karnataka assembly election campaign
 Karnataka assembly election campaign

Karnataka Assembly Elections 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज (दि.८ मे) सायंकाळी थंडावणार आहेत. १० मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस व भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांची राळ उठलेली आहे. दर पाच वर्षांनी सत्ताबदल करण्याची परंपरा मोडीत काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण कर्नाटक राज्य पिंजून काढत झंझावती दौरे केले आहेत. दुसरीकडे सत्ता खेचून आणण्यासाठी काँग्रेसही पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरली आहे.

कर्नाटकमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत आहे. निवडणूक रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसवर आक्रमकपणे हल्लाबोल करत आहेत. भाजप सातत्याने विजयाचा दावा करत आहे.

म्हैसूर जिल्ह्यातील नंजनगुड येथे प्रचारफेरीच्या माध्यमातून कर्नाटकमधील प्रचाराचा मोदींनी शेवट केला. मोदी म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या शाही परिवाराचा देशातील राजकारणावर प्रभाव आहे. त्यांनी छुप्या पद्धतीने परकीय शक्तींशी हातमिळवणी केली असून ज्यांना भारत आवडत नाही, अशा परकीय नेत्यांसोबत त्यांच्या बैठका झाल्या आहेत. तुकडे तुकडे गँगचा विचार काँग्रेसमध्ये इतक्या वरच्या पातळीवर पोहोचेल,असा विचार मी कधी केला नव्हता.

मोदी म्हणाले की, काँग्रेस जेव्हा सत्तेत येते,तेव्हा दहशतवादी आणि गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढतात. हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत धोकादायक आहे. काँग्रेसने दहशतवाद्यांचे तुष्टीकरण केलेले आपण याआधी केरळ आणि कर्नाटकात पाहिले आहे. १० मे रोजी, जेव्हा तुम्ही मतदान कराल, तेव्हा ही बाब ध्यानात ठेवा, असे आवाहन मोदी यांनी केले.

मोदी म्हणाले की, मी दुःख व्यक्त करत सबंध देशाला सांगू इच्छितो की, रविवारी शाही परिवाराने कर्नाटकच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याची भाषा वापरली. जेव्हा एखाद्या देशाला स्वातंत्र्य प्राप्त होते, तेव्हा तो देश सार्वभौम देश असल्याचे मानले जाते. काँग्रेस कर्नाटकाला जेव्हा सार्वभौम म्हणते, याचा अर्थ कर्नाटक भारतापेक्षा वेगळा आहे, असे काँग्रेसला सुचवायचे आहे का?” असा सवाल पंतप्रधान मोदी यांनी सभेत उपस्थित केला.

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी बंगळुरू येथील जाहीर सभेत पंतप्रधान मोदींच्या या आरोपाला प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, पंतप्रधान विकास आणि महागाईचे मुद्दे विसरले आहेत आणि मला ते सांगत असलेले आंतरराष्ट्रीय षडयंत्र समजू शकलेले नाही. पंतप्रधानांना अजूनही समजलेले दिसत नाही की, लोकांना त्यांचे दैनंदिन प्रश्न आणि अडचणींवर चर्चा हवी आहे. हाच खरा दहशतवाद आहे.

 

दरम्यान, कर्नाटकचे ४ वेळा मुख्यमंत्री राहिलेले बीएस येडियुरप्पा यांनी दावा केला आहे की विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आपण १३५ जागा जिंकू, असा मला विश्वास आहे. काँग्रेस हे बुडणारे जहाज आहे, त्यांचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांनी ४-५ महिने प्रचार करूनही यूपीमध्ये केवळ २-३ जागा जिंकल्या."

 

IPL_Entry_Point