मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Mocha Cyclone : भारताच्या पूर्व किनारपट्टीवर ‘मोखा’ चक्रीवादळाचं सावट, बंगाल आणि ओडिशात हाय अलर्ट

Mocha Cyclone : भारताच्या पूर्व किनारपट्टीवर ‘मोखा’ चक्रीवादळाचं सावट, बंगाल आणि ओडिशात हाय अलर्ट

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 09, 2023 10:43 AM IST

Mocha Cyclone Update : पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मोखा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Mocha Cyclone Update Satellite
Mocha Cyclone Update Satellite (HT)

Mocha Cyclone Update Satellite : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने उद्या म्हणजेच १० मे रोजी समुद्रात मोखा चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळं हवामान खात्याने पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील काही भागांमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे. ११ मे नंतर मोखा चक्रीवादळ बांगलादेश आणि म्यानमारच्या किनारपट्टीकडे सरकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर आता बंगालच्या उपसागरात मासेमारी करण्यासाठी जाणाऱ्या मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील हवामान मोठा बदल झाला आहे. त्यामुळं बंगाल, ओडिशा आणि अंदमानसह निकोबार येथे मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं आता संभावित वादळाचं गांभीर्य लक्षात घेता राज्य सरकारांनी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. मोखा चक्रीवादळ वेगाने पुढे सरकत असून त्याचे गंभीर परिणाम ओडिशा आणि बंगालच्या किनारपट्ट्यांवर दिसण्याची शक्यता आहे. याशिवाय उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

मोखा या चक्रीवादळाचा परिणाम मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशसह बिहारमध्ये दिसून येण्याची शक्यता आहे. ताशी ७० ते ९० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळं आता नागरिकांना विनाकारण बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. जागतिक हवामान संघटनेचं सदस्य असलेल्या येमेन या देशाने चक्रीवादळाचं नाव मोखा असं ठेवलं आहे.

IPL_Entry_Point