गोरक्षणासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारातून पैसे कापा; भाजपा नेत्याच्या वक्तव्यामुळं चर्चांना उधाण
Hardeep Singh Dang : गायी न पाळणाऱ्या लोकांना निवडणूक लढण्यावर बंदी घालण्याची मागणीही मंत्री डांग यांनी केली आहे. त्यामुळं यावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.
Hardeep Singh Dang Statment : महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आलेला आहे. गोपालनासाठी काही राज्यांनी आर्थिक निधी उपलब्ध करून दिला आहे. परंतु गोरक्षणासाठी निधी देण्याच्या मुद्द्यावरून अनेकदा राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगत असतात. परंतु आता गोरक्षणासाठी २५ हजार रुपयांपेक्षा जास्त मासिक पगार असलेल्या कर्मचाऱ्यांच्या खात्यातून ५०० रुपये गोळा करण्याची मागणी मध्यप्रदेशमधील मंत्री हरदीप सिंह डांग यांनी केली आहे. त्यामुळं आता यावरून मोठं राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.
ट्रेंडिंग न्यूज
एका कार्यक्रमात बोलताना मंत्री हरदीप सिंह डांग म्हणाले की, मी स्वत: गोपालक असल्यामुळं गायींच्या रक्षणासाठी मी विधानसभेत काही उपाययोजना सूचवल्या आहेत. त्यात २५ हजार रुपये पगार असलेल्या कर्मचाऱ्यांकडून महिन्याकाठी ५०० रुपये घेणं, गायींचं पालन करणाऱ्या शेतकऱ्यांनाच जमीनीच्या खरेदी-विक्रीचे अधिकार देणं आणि जो व्यक्ती गोपालन करत नसेल तर त्याला निवडणूक लढण्याचा अधिकार न देणं या गोष्टींची विधानसभेत मागणी केल्याचं मंत्री हरदीप सिंह डांग यांनी म्हटलं आहे. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मध्यप्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकांना काही महिन्यांचा अवधी उरलेला असताना मंत्री डांग यांनी केलेल्या वक्तव्यामुळं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मंत्री हरदीप सिंह डांग यांनी लोकांना गायी पाळण्याचं आवाहन करत मंचावरूनच भजनही गायलं आहे. त्यांच्या भजनाला उपस्थित लोकांनी मोठी दाद दिली. काही दिवसांपूर्वी भाजपच्या विकास यात्रेवेळी विविध प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी लोकांनी मंत्री डांग यांना घेराव घातला होता. त्यामुळं ते चर्चेत आले होते. याशिवाय अनेकदा डांग ते कोणत्या ना कोणत्या विषयावर वादग्रस्त वक्तव्य करत असतात, त्यांनी आता पुन्हा सरकारला विचित्र सल्ला दिल्यामुळं ते नव्या वादात सापडण्याची चिन्ह आहेत.