मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  मनीष सिसोदिया यांच्या अटकेवरून राजकारण तापले; देशातील नऊ विरोधी पक्षातील नेत्यांचे मोदींना पत्र

मनीष सिसोदिया यांच्या अटकेवरून राजकारण तापले; देशातील नऊ विरोधी पक्षातील नेत्यांचे मोदींना पत्र

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 05, 2023 12:19 PM IST

Excise Policy Case: आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते व दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावरील कारवाईचा निषेध करत उद्धव ठाकरेंसह देशातील नऊ विरोधी पक्षातील नेत्यांचे मोदींना पत्र लिहले आहे.

Uddhav Thakeray, Narendra Modi
Uddhav Thakeray, Narendra Modi

Nine Opposition leaders written to PM Modi: दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने २६ फेब्रुवारी २०२३ रोजी आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते व दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केली. मात्र, ही कारवाई निंदाजनक असल्याचे सांगत अनेक राजकीय नेत्यांनी मनीष सिसोदिया यांना पाठिंबा दर्शवला. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षातील नऊ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून मनीष सिसोदिया यांच्यावरील कारवाईचा निषेध केला. देशात तपास यंत्रणाच्या माध्यमातून विरोधाकांवर दबाव निर्माण केला जात असल्याचा आरोपही त्यांनी पत्रातून केला आहे. तसेच देशाने हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केल्याचेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.

"दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्यात मनीष सिसोदिया यांची प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर त्यांना २६ फेब्रुवारी २०२३ रोजी अटक करण्यात आली. मात्र, कोणतेही पुरावे नसताना तसेच खोटे आरोप लावून त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर झालेली कारवाई राजकीय असल्याचे दिसून आले. देशात २०१४ मध्ये भाजपची सत्ता आली. मात्र, तेव्हापासून विरोधी पक्षांतील नेत्यांवर होणाऱ्या कारवाईच्या प्रमाणात मोठी वाढ झालीय. अनेकांना खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली. ज्या विरोधी पक्षांतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यापैकी ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यांच्याविरोधात नंतर कोणतीही कारवाई झाली नाही. ज्यात आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, सुवेंदी अधिकारी, मुकूल रॉय, नारायण राणे यांसारख्या नेत्यांचा समावेश आहे", असा आरोप नरेंद्र मोदी यांना लिहलेल्या पत्रातून करण्यात आला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (आम आदमी पक्ष), तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (बीआरएस), पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी (तृणमूल कांगेस), पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (आम आदमी पक्ष), तेजस्वी यादव (राष्ट्रीय जनता दल), फारूक अब्दुल्ला (जेकेएनसी), शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस), उद्धव ठाकरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि अखिलेश यादव (समाजवादी पक्ष) या नऊ विरोधी पक्षांतील नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

IPL_Entry_Point