मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rain in Dubai : दुबईत पावसाचे थैमान, शाळा बंद, विमानतळ बंद, कार गेल्या वाहून

Rain in Dubai : दुबईत पावसाचे थैमान, शाळा बंद, विमानतळ बंद, कार गेल्या वाहून

Haaris Rahim Shaikh HT Marathi
Apr 17, 2024 08:14 AM IST

दुबईत पावसाने थैमान घातले असून पावसामुळे येथील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. विमानतळावर पाणी साचल्याने भारत, पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि ब्रिटनला जाणारी १२ विमाने रद्द करण्यात आली आहे.

Rain in Dubai. Air traffic affected
Rain in Dubai. Air traffic affected

वाळवंटात वसलेल्या दुबईमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. पावसामुळे येथे मोठी पूरस्थिती निर्माण झाली असून दुबई प्रशासनाने शाळा बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने अनेक ठिकाणी पाण्यात कार तरंगत असताना दिसत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. जगातील सर्वाधिक व्यस्त विमानतळापैकी एक मानल्या जाणारे दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मंगळवारी तब्बल अर्धा तास संपूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. यादरम्यान, जगभरातून दुबईला येणारी अनेक उड्डाणे इतरत्र वळवण्यात आली होती. वादळाचा सर्वाधिक फटका भारत, पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि ब्रिटनहून दुबईला येणाऱ्या विमानांना बसला. या देशांमधून येणारी अनेक विमाने रद्द करण्यात आली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

दुबईत जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांनी सोशल मीडियावर पावसाचे अपडेट्स आणि व्हिडिओ शेअर केले आहे. काही व्हिडिओमध्ये रस्त्यावरून कार वाहून जाताना दिसत आहेत, तर आणखी एका व्हिडिओमध्ये दुबईच्या सर्वात लोकप्रिय मॉलमध्ये पाणी शिरल्याने एका दुकानाचे छत कोसळताना दिसत आहे.

मॉलमध्ये भरलं पाणी

दुबईत काल, मंगळवारी दिवसभर जोराचा पाऊस, वाळूचे वादळ आणि वीजांचा कडकडाट होता. पावसामुळे रस्त्यावरची वाहतूक संथ झाली होती. शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेले दुबईमधले ‘दुबई मॉल’ आणि 'मॉल ऑफ द अमिराती' या प्रमुख शॉपिंग सेंटर्सना पुराचा मोठा फटका बसला. दुबईतील अनेक मेट्रो स्थानकांमध्ये पाणी साचल्यामुळे मेट्रोसेवाही विस्कळीत झाली होती.

विमानतळावर प्रचंड गोंधळ

दुबईत पावसामुळे सर्वाधिक फटका विमानप्रवाशांना बसला. विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर भरपूर पाणी साचले होते. मंगळवारी सायंकाळी १०० हून अधिक विमानांचे दुबईत आगमन होणार होते. परंतु वादळामुळे विमानतळावर काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. परिणामी काही काळासाठी विमानतळावरील कामकाज थांबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. संध्याकाळी दुबईहून विमान प्रस्थानाला सुरूवात झाली. परंतु विमानउड्डाण फार उशिराने होत असल्याने प्रवाशी त्रस्त झाले होते. दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीची सरकारी वृत्तसंस्था डब्ल्यूएएमने दिलेल्या वृत्तानुसार, खराब हवामानामुळे फ्लाई दुबईने बुधवारी सकाळपर्यंत दुबईहून निघणारी सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित केली आहे.

दुबईत काही भागांत अनेक घरांमध्येही पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा लागला आहे.

वाळवंटी प्रदेश असलेल्या दुबईत पाऊस पडण्याचे प्रमाण अल्प आहे. साधारण हिवाळ्याच्या दिवसांमध्ये येथे दरवर्षी थोडाफार पाऊस पडत असतो. पाऊस पडण्याचे प्रमाण कमी असल्याने रस्त्यावरील सांडपाणी वाहून जाण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यात आलेली नाही. परिणामी वादळी पाऊस आल्यानंतर रस्त्यावर पाणी तुंबल्यामुळे शहरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग