मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  उद्धव ठाकरे करणार महाराष्ट्र दौरा; पक्षबांधणीसाठी रस्त्यावर उतरणार

उद्धव ठाकरे करणार महाराष्ट्र दौरा; पक्षबांधणीसाठी रस्त्यावर उतरणार

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jul 17, 2022 09:15 AM IST

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पक्षाला बळ देण्यासाठी आता उद्धव ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. यात ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका आणि मेळावे घेतील.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (फोटो - दीपक साळवी)

Uddhav Thackeray On Maharashtra Tour: शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात मोठी उलथापालथ झाली. मोठ्या प्रमाणावर शिवसेनेतून (Shivsena) आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. फक्त आमदारच नव्हे तर राज्यातील अनेक ठिकाणी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचे समर्थन केले आहे. अशा परिस्थितीत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर आता पक्ष वाचवण्याचं आव्हान आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी निष्ठा यात्रा सुरू केली आहे. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनीही पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचा सपाटा लावला आहे. आता उद्धव ठाकरे लवकरच थेट रस्त्यावर उतरणार आहेत. शिवसैनिक शिवसेनेसोबतच आहेत हे दाखवण्यासाठी ते महाराष्ट्र दौरा करणार आहेत.

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र दौऱ्यात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका आणि मेळावे घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी शनिवारी महाराष्ट्र दौऱ्याबाबतची घोषणा केली. पक्षबांधणीसाठी हा दौरा करणार असून पक्ष पुन्हा उभा करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची तयारी सुरू असून यामध्ये शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे हेदेखील सोबत असतील.

पक्षाला पुन्हा आधीचं वैभव मिळवून देण्यासाठी आणि शिंदे गटाला आव्हान देण्यासाठी उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर फिरणार आहेत. बंडखोरीनंतर पक्षाला बळ देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे हे सातत्यानं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत.

आता महाराष्ट्र दौऱ्याची आखणी करताना राज्यातील पावसाचा अंदाज घेतला जाईल. त्यानुसार लवकरच उद्धव ठाकरे त्यांचा महाराष्ट्र दौरा जाहीर करतील. या दौऱ्याची सुरुवात मुंबईपासून होणार असल्याचं म्हटलं जातंय. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा उद्धव ठाकरे घेणार आहेत.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या