मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  नवनीत राणांचा कारागृहातील अनुभव ऐकून धक्का बसला - किरीट सोमय्या

नवनीत राणांचा कारागृहातील अनुभव ऐकून धक्का बसला - किरीट सोमय्या

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 05, 2022 08:25 PM IST

राणा दाम्पत्याची भेट घेण्यासाठी भाजपाचे नेते किरीट सोमय्या देखील लीलावती रुग्णालयात पोहचले होते. सोमय्यांनी यावेळी त्यांची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला.

सोमय्यांनी नवनीत राणांची रुग्णालयात घेतली भेट
सोमय्यांनी नवनीत राणांची रुग्णालयात घेतली भेट

मुंबई - मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टाने अखेर आज तब्बल १२ दिवसांनी राणा दाम्पत्याची सुटका केली. खासदार नवनीत राणा यांना स्पोंडिलोसिस (मानदुखी) या आजाराचा त्रास असल्यामुळे त्या थेट कोठडीतून बाहेर आल्यानंतर लीलावती रुग्णालयात दाखल झाल्या. त्यानंतर ५ ते ६ तासांनी रवी राणांची कोठडीतून सुटका झाली. त्यानंतर ते पत्नी नवनीत राणांची भेट घेण्यासाठी लीलावती रुग्णालयाच पोहचले.

या १२ दिवसात राणा दाम्पत्याची भेट झाली नव्हती. नवनीत राणा यांना भायखळा जेलमध्ये तर रवी राणा यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आले होते. तेव्हा पासून राणा दाम्पत्याची भेट झाली नव्हती. कोर्टात सुनावणीच्या वेळी काही क्षण दोघांची भेट झाली होती. आज सकाळी भायखळा तुरुंगातून सुटका झाल्यानंतर नवनीत राणा यांना लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नवनीत राणा यांच्या सुटकेनंतर तब्बल ५ ते ६ तासांनी रवी राणा यांची तळोजा तुरुंगातून सुटका झाली.

नवनीत राणा यांना मणक्यासंबंधित त्रास असल्याने त्या वारंवार रुग्णालयात जाण्यासाठी तुरूंग प्रशासनाकडे विनंती करत होत्या. नवनीत राणा यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पती रवी राणा यांची भेट झाल्यानंतर नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले होते. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

त्यांचा अनुभव ऐकून इंग्रजांच्या काळाची आठवण झाली -सोमय्या

राणा दाम्पत्याची भेट घेण्यासाठी भाजपाचे नेते किरीट सोमय्या देखील लीलावती रुग्णालयात पोहचले होते. सोमय्यांनी यावेळी त्यांची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला. राणा दाम्पत्याचा कारागृहातील अनुभव ऐकून मला धक्का बसला. तसेच मला त्यांचा अनुभव ऐकून इंग्रजांच्या काळाची आठवण झाली, असं किरीट सोमय्या म्हणाले. दरम्यान, नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील निवासस्थान 'मातोश्री' बाहेर २३ एप्रिल रोजी हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याचे कारण देत या जोडप्याने त्यांचे आंदोलन रद्द केले होते. मात्र त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.

राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करत त्यांना तुरुंगात टाकले होतं. त्यांच्या विरोधात पोलिसांनी भादंवि कलम १२४ अ नुसार राजद्रोह,राज्य सरकारविरोधात प्रक्षोभक विधाने करणे आणि सरकारला आव्हान देणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. अखेर बारा दिवसांनी जामीन मिळाल्यानंतर राणा दाम्पत्य तुरुंगातून बाहेर आलं आहे.

IPL_Entry_Point